सध्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद दिवसागणिक चिघळत चालला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई हे जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांवर हक्क सांगत आहेत, त्यामुळे हा वाद आणखी पेटला आहे. अशा परिस्थिती महाराष्ट्रातील सर्व पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अशा परिस्थितीत आता या वादात सामाजिक संस्थाही पडल्या आहे. सोमवारी, ६ डिसेंबर रोजी कन्नड रक्षण वेदिका या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावजवळील हिरेबागवाडी येथे अक्षरशः धुडगूस घालत महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यावर शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया आली.
काय म्हणाले मंत्री सामंत?
कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाली असेल तर ही निषेधार्ह बाब आहे. मी याचा जाहीर निषेध करतो. सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असून, प्रत्येक राज्याने आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे. हीच भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. असे असताना महाराष्ट्रातील जनतेच्या सहनशक्तीचा कोणी अंत पाहू नये. कर्नाटक सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घातले पाहिजे. हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. आपण एका देशात राहत असून, कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य असेल, अशी भूमिका घेतली पाहिजे. पण गेल्या काही दिवसांपासून जे उकसवायचे काम सुरु केले आहे ते बंद केले पाहिजे. तसेच संबंधितांवर कडक कारवाई करावी. यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. महाराष्ट्राला आक्रमकता काय असते हे चांगलेच माहिती आहे. आक्रमकता काय असते याचे धडे दुसऱ्या राज्यातून घेण्याची गरज नाही’, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.
(हेही वाचा Maharashtra-Karnataka Border Dispute: सीमावाद चिघळला, कानडींचा महाराष्ट्र द्वेष; बेळगावनजीक घातला धुडगूस)
Join Our WhatsApp Community