मुख्यमंत्र्यांनी दिलेले गटनेतेपदाचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांनी स्वीकारले

एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेतील आमदारांची संख्या ही वाढत जात आहे. आता एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शिवसेनेच्या प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड करत आपलाच पक्ष खरा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. पण आता याबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठे विधान केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या जागी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र आपण स्विकारले असल्याचे झिरवळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांनी केलेली प्रतोदपदाची निवड ही अयोग्य असल्याचे स्पष्ट होत आहे.

(हेही वाचाः विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले, नितीन देशमुख यांची सही तपासून घेणार)

काय म्हणाले झिरवळ?

कायद्यानुसार, पक्षप्रमुख हा गटनेत्याची निवड करत असतो आणि गटनेता प्रतोद विधीमंडळाचा प्रतोद नेमतो. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदाच्या निवडीचे दिलेले पत्र मी स्विकारले असल्याचे झिरवळ यांनी म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आमदारांच्या सहीच्या पत्राचा मी अभ्यास करणार आहे. आमदार नितीन देशमुख यांच्या सहीमध्ये गोंधळ असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याची पडताळणी करुन मी योग्य तो निर्णय घेईन, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे.

शिंदेंनी केली प्रतोदाची नियुक्ती

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेतील बंडखोर आमदारांना शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभु यांनी बुधवारी एक पत्र पाठवून पक्षाच्या सभेला उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी थेट भरत गोगावले यांची शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली. त्यांच्या या मोठ्या निर्णयामुळे आता एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचे म्हटले जात होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here