राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीत बिघाडी सुरु झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यामुळे नाराज झालेली शिवसेना आक्रमक झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत तुमचे तुम्ही बघा अशा शब्दांत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुनावले आहे.
शिवसेनेचा महाविकास आघाडीवरील विश्वास उडाला
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला हवी तशी मदत केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान करुन शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला पाडण्यात हातभार लावला. त्यामुळे शिवसेना आता महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीवर विश्वास ठेवायला तयार नाही. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विधानपरिषदेत आपापले बघा, निर्वाणीचा निरोप शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
(हेही वाचा आता विधान परिषदेचा आखाडा! काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराचा ‘संजय पवार’ होणार!)
शिवसेना म्हणून झाली नाराज
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा सहावा उमेदवार पराभूत झाल्याने हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार उभा केला होता. सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातील संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीकडे मते असताना शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. तर भाजपचे धनंजय महाडिक हे विजयी झाले. त्यामुळे भाजपचा कमालीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांच्याकडे जास्तीची मते नसताना महाविकास आघाडीतील आमदारांनी मदत केल्यामुळे शिवसेना नाराज झाली आहे. ही नाराजी शिवसेना नेते संजय राऊत यांनी बोलूनही दाखवली.
Join Our WhatsApp Community