भाजप-शिंदे गटाच्या सरकारचे समर्थक आमदार बच्चू कडू हे सध्या सरकारच्या विरोधात अधून मधून जाहीरपणे नाराजी व्यक्त करत असतात. मधल्या काळात तर भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्यासोबत यांच्यात मोठे वाद निर्माण झाले होते. त्यावेळी त्यांनी सरकार अडचणीत आणू, अशी धमकीही दिली होती. आता बच्चू कडू यांनी आगामी विधान परिषदेच्या सर्व ५ जागा त्यांचा प्रहार पक्ष लढवणार आहे, अशी घोषणा करून उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे.
३० जानेवारी रोजी ५ विभागीय पदवीधर-शिक्षक मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये प्रहार संघटनेकडून मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघात डॉ. संजय तायडे, अमरावतीमधून किरण चौधरी, नरेशशंकर कौंडा हे कोकणातून, अतुल रायकर हे नागपूर तर वकील सुभाष झगडे हे नाशिक विभागातून निवडणूक लढणार आहेत. मेस्टा आणि प्रहार संघटना मिळून या निवडणुका लढवणार आहे. यातील १-२ जागा कुठल्या परिस्थितीत विजयी होणार, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला.
(हेही वाचा येशूचे रक्त प्या, पूजा करा म्हणत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न; आळंदीत गुन्हा दाखल)
विश्वासात घेतले नाही म्हणून घेतला निर्णय
आम्ही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना कल्पना दिली होती. या मतदारसंघात आम्ही गेल्या ३ वर्षापासून मेहनत घेत आहोत. मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे आम्हाला विचारात घेऊन उमेदवार द्यावेत जेणेकरून प्रहार- भाजपा -शिवसेना अशी युती करावी. परंतु त्यांचा काही निरोप आला नाही. त्यामुळे पाचही विभागात उमेदवार उभा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मैत्रीपूर्ण या लढती लढू, असे बच्चू कडू म्हणाले. आमचे पाचही उमेदवार अर्ज भरतील. आम्हाला विश्वासात घेतले नाही म्हणून आम्ही पाचही जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला, असेही कडू म्हणाले.
Join Our WhatsApp Community