Maharashtra Legislative Council: जयंत पाटलांचा गेम; ‘मविआ’चा चढता आलेख कोसळला!

202
जयंत पाटलांचा गेम; ‘मविआ’चा चढता आलेख कोसळला!
जयंत पाटलांचा गेम; ‘मविआ’चा चढता आलेख कोसळला!
  • सुजित महामुलकर

लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्यानंतर हुरळून गेलेल्या महाविकास आघाडीने अतिआत्मविश्वास दाखवत विधान परिषद निवडणुकीत एक अधिकचा उमेदवार दिल्याने विजयाचा चढता आलेख कोसळला. यामुळे महायुतीची सरशी झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीला (Assembly Elections) सामोरे जाताना महाविकास आघाडीला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागणार, हे मात्र नक्की.  (Maharashtra Legislative Council)

आठ मते फुटली

शुक्रवारी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात विधानसभेतील आमदारांनी मतदान केले. परिषदेच्या ११ जागांसाठी महाविकास आघाडीने १२ वा उमेदवार दिला आणि बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीत माती खाल्ली. महाविकास आघाडीचा शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांना ‘मविआ’च्याच आमदारांनी पाडले. कॉँग्रेसची ७ मते तर राष्ट्रवादी (शप) गटाचे एक मत फुटल्याने पाटील यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे. (Maharashtra Legislative Council)

जयंत पाटीलच का पडले?

कॉँग्रेसच्या सात आणि डोळे झाकून विश्वास ठेवलेल्या राष्ट्रवादीच्या (शप) गटाच्या एकाने ‘क्रॉस वोटिंग’ केले हे आता जवळपास स्पष्ट झाले. याची कबुलीही पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. मुळात ‘मविआ’ने २ उमेदवार सहज निवडून येतील इतके संख्याबळ असताना तिसरा उमेदवार देण्याची गरजच नव्हती. ‘झाकली मूठ सव्वालाखाची’ राहिली असती पण ‘हात’ दाखवून अवलक्षण, असा प्रकार पाटील यांच्या बाबतीत घडला. पाटील यांनी पत्रकार परिषदेत आजचे राजकारण बदलले आहे, असे सांगितले. हे त्यांच्यासारख्या अनुभवी माजी आमदाराला कळूनही ‘वळू’ नये, हेच आश्चर्य. पण ठेच लागेपर्यंत त्यांनी वाट पाहिली आणि फटका बसला.

(हेही वाचा – सर्वोच्च न्यायालय म्हणाले, घटस्फोटीत Muslim महिलेला पोटगी द्या; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा नकार म्हणते, आम्ही शरियत कायदे मानतो)

अनेक वर्षांची सुप्त इच्छा पूर्ण

‘मविआ’ने तिसरा उमेदवार दिला आणि तिथेच जयंत पाटील यांचा गेम झाला. ‘मविआ’च्या मतांचा आणि उमेदवारांचा विचार करता, कॉँग्रेसकडे ३७ मते असतानाही त्यांनी एकच उमेदवार दिला. एका उमेदवारला किमान २३ मतांची गरज होती हे लक्षात घेऊन कॉँग्रेसने कोणताही धोका न पत्करता दूसरा उमेदवार देणे टाळले. तर शिवसेना उबाठाने १६ मते असताना आपला उमेदवार उभा केला आणि तोही राजकारणातील ‘नारद’, ‘बहुगुणी’ असा मिलिंद नार्वेकर. तेव्हाच पाटील यांनी ही धोक्याची घंटा ओळखायला हवी होती. नार्वेकर यांचे सर्वपक्षीय राजकीय ‘हित’संबंध, त्यांची ‘पोच’ लक्षात घेण्यात पाटील कमी पडले आणि त्यांना गृहीत धरून निवडणुकीला सामोरे गेले. नार्वेकर यांनी अनेक वर्षांची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावत केवळ १६ खात्रीच्या मतांच्या जोरावर वरील ८ मतांची जुळवाजुळव करत २४ मते मिळवली. विधानपरिषदेत जयंत पाटील यांना बाहेरचा रास्ता दाखवत यांच्या जागी स्वतःचे बस्तान बसवले. (Maharashtra Legislative Council)

‘उपद्रवमूल्य’ किती?

शेकापचे जयंत पाटील यांच्या पराभवानंतर शिक्षक भारतीचे माजी आमदार कपिल पाटील यांनी ‘मविआ’तील मोठे पक्ष लहान पक्षांना संपवत आहेत’ अशा आशयाचे विधान केले. याच्याशी जयंत पाटील यांनी आपण सहमत नसल्याचे सांगितले. पण कपिल पाटील यांच्या बोलण्यात काही प्रमाणात तथ्य आहे. गेल्या २५-३० वर्षात राजकारण प्रचंड बदलले आहे. लहान पक्ष असला तरी त्यांचे ‘उपद्रवमूल्य’ किंवा ‘न्यूसेन्स वॅल्यू’ किती आहे, यावर त्या लहान पक्ष किंवा आमदाराचे महत्व ठरत आहे. सत्ताधारी भाजपाने शेतकऱ्यांच्या नुकत्याच स्थापन केलेल्या ‘रयत क्रांती संघटने’च्या सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना याच विधानपरिषदेच्या ११ जागांपैकी एक जागा देऊन निवडूनही आणले. याउलट राज्यात वर्षानुवर्षे राजकारणात असलेला शेकाप (शेतकरी कामगार पक्ष) विधानपरिषदेत संपुष्टात येतो, याचा विचार जुन्या पक्षांनी करणे गरजेचे आहे.

(हेही वाचा – Mukhyamantri Tirth Darshan Yojana: भक्तांसाठी खुशखबर! ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजनेचा निघाला GR )

…कारण शरद पवारांचा प्रत्यक्ष उमेदवारच नव्हता

या निवडणूकीमुळे आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आमदारांसाठीची ‘हॉटेल डिप्लोमसी’ फळाला आली. ज्या राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना २ दिवस हॉटेलमध्ये ठेवले त्या पक्षाची मते फुटली नाहीत. भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार) या महायुतीच्या तर महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठाने आपल्या आमदारांसाठी हॉटेल व्यवस्था केली होती. कॉँग्रेस पक्ष ‘हॉटेल डिप्लोमसी’च्या भानगडीत पडला नाही. मग कॉँग्रेसकडे एका उमेदवारासाठी पुरेशी मते असल्याने म्हणा किंवा हॉटेलचा खर्च कोण करणार? या प्रश्नामुळे असो. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा ‘हॉटेल डिप्लोमसी’त पडण्याचा काही प्रश्नच नव्हता. याचे कारण त्या पक्षाचा कुणीही निवडणूक रिंगणार प्रत्यक्ष उमेदवार नव्हता तर पुरस्कृत उमेदवार होता. त्यामुळे राष्ट्रवादीने दुसऱ्या पक्षासाठी हॉटेलचा खर्च उचलणे व्यवहार्य नव्हतेच. याचा विचार जयंत पाटील यांनी करण्याची गरज होती.   (Maharashtra Legislative Council)

एकूणच जयंत पाटील (SKP Jayant Patil) यांच्या पराभवाने ‘मविआ’चा पारा खाली आला आणि महायुतीचा द्विगुणित झाला. हा ट्रेंड असाच राहिला तर विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’ने लोकसभेला सुरू केलेले ‘फेक नरेटीव्ह’चा खेळ संपला असे म्हणण्यास वाव आहे.

विधान परिषदेचे विजयी उमेदवार

पंकजा मुंडे (भाजपा)
परिणय फुके (भाजपा)
सदाभाऊ खोत (भाजपा)
अमित गोरखे (भाजपा)
योगेश टिळेकर (भाजपा)
भावना गवळी (शिवसेना शिंदे)
कृपाल तुमाने (शिवसेना शिंदे)
राजेश विटेकर (राष्ट्रवादी अजित पवार गट)
शिवाजीराव गर्जे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
प्रज्ञा सातव (काँग्रेस)
मिलिंद नार्वेकर (शिवसेना उबाठा)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.