खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे गुरूवारी तब्बल १२ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर पडले. या दोघांचाही जामीन मंजूर झाला असून दोन्ही पक्षांकडून गुरूवारी ५०-५० हजार रुपयांचे जामीनपत्र बोरिवली न्यायालयात जमा करण्यात आले. दरम्यान, नवनीत राणांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रूग्णालयात 5 मे रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवसांनंतर लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना नवनीत यांच्या हातात हनुमान चालिसा आणि अंगावर श्रीराम लिहिलेली भगवी शाल दिसली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला तर इतकेच नाही तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज दिल्याचे देखील बघायला मिळाले.
डिस्चार्ज मिळताच राणांची पहिली प्रतिक्रिया
तसेच मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज देत राणा म्हणाल्या, ठाकरे सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला आहे. माझे उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की, त्यांनी लोकांमध्ये येऊन निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवावी. त्यांच्याविरोधात एक महिला उभी राहील. तुम्ही कोणत्याही मतदारसंघातून लढा, मी तुमच्या विरोधात असेन हा माझा इशारा आहे. माझ्यावर त्यांनी जे अत्याचार केलेत, त्याचं उत्तर पुढच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जनताच देईल. ठाकरेंची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी उभी राहीन आणि शिवसेनेविरोधात प्रचार करीन.
ही लढाई पुढेही सुरू ठेवणार
मी आज डॉक्टरांना विनंती करून माझा डिस्चार्ज करून घेतला आहे. माझ्या बऱ्याच वैद्यकीय तपासण्या बाकी आहे. ज्या १४ दिवसांत माझ्यावर तुरूंगात अत्याचार करण्यात आला, याबद्दल मला प्रश्न आहे की, मी कोणती चूक केली होती, रामाचं आणि हनुमानाचं नाव घेणं ही जर चूक असेल आणि त्यासाठी मला तुरूंगवास देण्यास आला. याबद्दल मी त्यांना सांगू इच्छिते की, जर हनुमानाचं, श्री रामाचं नाव घेणं हा गुन्हा असेल तर मी १४ वर्षे तुरूंगात राहण्यास तयार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही महिला १४ दिवसांत शांत बसेल तर लक्षात घ्या तुम्हील १४ दिवसांत महिलेचा आवाज दाबू शकणार नाही. ही लढाई देवाच्या नावाची आहे, ही लढाई पुढेही सुरू ठेवणार. ज्या पद्धतीने माझ्यावर कारवाई झाली, जनतेने महिलेवर केलेली ती क्रूर कारवाई पाहिलीये, सर्वांना त्याबद्दल खेद आहे, असे नवनीत राणांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community