भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांच्यासह महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. बृजभूषण सिंह यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे. यानंतर बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्यावर मनसे कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यानंतर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसे कोणताही विरोध करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – आता शिक्षकांचं ‘टेन्शन’ वाढणार! कारण शिक्षकांना द्यावी लागणार ‘परीक्षा’!)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बृजभूषण सिंह यांच्या पुणे दोऱ्याला विरोध करू नका असे आदेश दिल्यानंतर वसंत मोरेंनी मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले वसंत मोरे
राज ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे अयोध्या दौऱ्यावर गेले नव्हते. यामध्ये इतर कुठलाही विषय नव्हता. राज ठाकरे जरी अयोध्येला गेले नव्हते तरी मनसैनिकांनी अयोध्येत जाऊन दर्शन घेतलं होते. त्यामुळे मनसैनिकांची ताकद किती आहे हे संपूर्ण देशाला माहित आहे. अन्यथा आमच्याही अंगाला लाल माती लागली आहे. कुस्ती कशी खेळायची याविषयी देखील आम्हाला चांगलेच माहित आहे. मात्र राज ठाकरे यांचा आदेश असल्यामुळे ब्रिजभूषण सिंग यांना मनसे विरोध करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याबाबत स्वतः राज ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी या दौऱ्याला विरोध न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनसे बृजभूषण सिंह यांना पुण्यात प्रवेश देणार आहोत. राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करणे पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे काम आहे. ते काम आम्ही करत आहोत. राज ठाकरेंनी जर आदेश दिले नसते तर बृजभूषण सिंह यांना महाराष्ट्रात पाय ठेवू दिला नसता, असेही वसंत मोरे म्हणाले.