गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन पोलिसांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी काढले.
भामरागड तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे म्हणाले, यापूर्वी पालकमंत्री असताना मी अनेक ठिकाणी दुर्गम भागात भेटी दिल्या. विकासाचे काम आता गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधांची निर्मिती करून हा भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे.
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता अनेक सण नागरिक मनमोकळेपणाने साजरे करीत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. पोलीस महत्त्वाचा घटक असून पोलीसांच्या पाठीमागे शासन भक्कमपणे उभे आहे. तसेच, आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गडचिरोलीत विविध योजना, नवीन उद्योग, लोकांच्या हाताला काम देण्याबाबत सरकारने नियोजन केले आहे. पूर्वीचा गडचिरोली आणि आत्ताचा गडचिरोली यात अमुलाग्र बदल झालेला दिसत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
सरकारच्या पाठिंब्यामुळे पोलिसांचे मनोबल वाढते
महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवर येऊन जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करण्याचा घेतलेला निर्णय हा पोलीस जवानांसाठी अतिशय आनंदाचा आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळेच गडचिरोली पोलीस उत्कृष्ट काम करीत आहेत, असे पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुप्षहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.
Join Our WhatsApp Community