पोलिसांच्या बदल्या झाल्याच नाही, ‘ती’ यादी खोडसाळपणाने व्हायरल

गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

135

राज्यातील पोलीस दलात अनागोंदी कारभार सुरु असताना राज्यातील सरकारी अधिकारी आणि प्रशासनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दबाव नाही, असा आरोप सातत्याने विरोधकांकडून होत आहे. अशातच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्हायरल होणारी पोलीस बदल्यांची यादी चुकीची असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच बदल्यांची यादी खोडसाळपणाने व्हायरल करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही विरोधकांचा आरोप

बदल्यांबाबत राज्य सरकारकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची ही यादी नेमकी बाहेर लीक झाली कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप पुन्हा विरोधकांकडून केला जात आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की, समाजमाध्यमांवर या व्हायरल झालेल्या यादीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही देखील नाही. सध्या बदल्यांचा कोणताही प्रस्ताव नाही. ती जी लिस्ट व्हायरल झाली आहे. ती पूर्णपणे चुकीची असून खोडसाळपणाने करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेतला असून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

(हेही वाचा –पोलीस दलात अदला-बदलीचा खेळ सुरूच! ४० सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या)

मुख्यमंत्र्यांची सही होण्यापूर्वीच यादी व्हायरल

मुख्यमंत्र्यांची सही होण्यापूर्वीच कोणीतरी ही यादी व्हायरल केल्याचे बोलले जात आहे. सहा महिन्यांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृहखात्याकडून देण्यात आल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात एका व्यक्तीने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजासारखा आवाज काढून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची सूचना केली होती. परंतु अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी शरद पवारांना फोन करण्यात आला होता. यानंतर अज्ञात व्यक्तीने फोन केला असल्याची घटना उघडकीस आली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.