विरोधकांची बाजू कायदेशीरदृष्टया तकलादू असल्याने त्यांचा प्रत्येक वेळी न्यायालयात वेळकाढूपणा सुरू आहे. मात्र, पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सलग सुनावणी घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय म्हणजे विरोधकांच्या खोटारडेपणाला चपराक आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते, खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
काय म्हणाले राहुल शेवाळे?
पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सदर प्रकरणाची नियमित सुनावणी 21 फेब्रुवारीपासून घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सूनावणीवर लवकरात लवकर निर्णय व्हायला हवा, ही महाराष्ट्रातील जनतेची आणि आमची देखील मागणी आहे. मात्र, हा निर्णय लांबणीवर जाण्यासाठी विरोधकांकडून विविध प्रकारचे अडथळे निर्माण केले जात आहेत. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाऐवजी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण नेण्याची विरोधकांची मागणी देखील याच प्रयत्नाचा भाग आहे. विरोधकांचा न्यायालय, निवडणूक आयोग आणि लोकशाहीवर देखील विश्वास नाही. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे घटनेनुसार स्थापन करण्यात आलेले कायदेशीर सरकार असून सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सूनावणीबाबत लवकर निर्णय व्हावा, ही आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. नबाम रेबिया प्रकरणाचा संदर्भ घेण्यासाठी विरोधक हरकत घेत आहेत. मात्र, आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेत नाबाम रेबीया प्रकरणाचा संदर्भ दिला आहे. ही दुटप्पी भूमिका आहे, असेही शेवाळे म्हणाले.
Join Our WhatsApp Community