शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात केलेल्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला विरोध केला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार नको, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारपुढे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता नाट्यादरम्यान, शिंदे गटाने राज्यपाल कोश्यारींना पत्र पाठवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शिंदे गटाने काय लिहिले पत्रात
तब्बल ८ दिवसांनंतर अखेर एकनाथ शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला आहे. शिंदे गटाने तसे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. आम्ही ३९ आमदार ठाकरे सरकारचा पाठिंबा काढत आहोत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं असून सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा, असे पत्रच शिंदे गटाने राज्यपाल कोश्यारींना पाठवले आहे. त्यामुळे आता राज्यातील सत्तेच्या हालचालींचे केंद्र राजभवनावर केंद्रीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटाने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रानंतर कोश्यारी कोणता निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर गुरूवारी सुनावणी सुरू आहे. कोर्टातील याचिकेतही त्यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे, असे शिंदे गटाने याचिकेत म्हटले. न्यायालयात या मुद्द्यावर सुनावणी सुरू असताना शिंदे गटाने राज्यपालांना भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिल्याने ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचे सांगितले जात आहे.
याचिकेत काय म्हटले
दरम्यान, शिंदे गटाच्या ३९ शिवसेना आमदार आणि इतर १२ अपक्षांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. शिंदे यांच्या गटाने केलेल्या दाव्याचा विचार केला तर महाविकास आघाडीकडे आता फक्त ११५ आमदारांचं बहुमत उरलेले आहे आणि त्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे असे समजण्यास काही हरकत नाही असे याचिकेत म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community