सर्वाेच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यावर गुरुवार, ११ मे रोजी निर्णय येण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशाचा देशातील नागरिक सन्मान करतील. जे नागरिक संविधान आणि लोकशाहीचा सन्मान करतात ते संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांचा पण आदर ठेवतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे मत महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.
पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमासाठी बुधवारी नार्वेकर पुण्यात आले हाेते यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वाेच्च न्यायालय ११ मे राेजी महत्वपूर्ण निर्णय देणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आपली भूमिका अतिशय महत्वाची आहे असे असतानाही आपण परदेशात जात आहात असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर नार्वेकर म्हणाले, माझी जबाबदारी उद्यापासून महत्वाची नाही तर मी अध्यक्ष म्हणून विराजमान झालाे तेव्हापासून मी जबाबदारीपूर्वक कार्य करीत आहे. मी कायमस्वरूपी जात नाही तर दाेन-तीन दिवसांसाठी परदेश दौऱ्यावर जात आहे त्यामुळे सुनावणी आणि इतर सर्व कार्य व्यवस्थित हाेत राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आमदार अपात्रतेचा निर्णय केवळ आणि केवळ विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात. विधानसभा अध्यक्षाने घटनाबाह्य निर्णय घेतला तरच सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करता येतो. विधानसभा अध्यक्षांचे ऑफिस जेव्हा रिक्त असतं किंवा विधानसभा अध्यक्ष कार्यरत नसतात त्यावेळी केवळ विधानसभा उपाध्यक्षांकडे सगळे अधिकार जातात. पण जेव्हा विधानसभा अध्यक्ष पदावर येतात, किंवा कार्यरत असतात त्यावेळी उपाध्यक्षांकडे दिलेले अधिकार संपुष्टात येतात आणि अधिकार पुन्हा अध्यक्षांकडे येतात. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय केवळ आणि केवळ विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात, असेही नार्वेकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community