एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सध्या राज्यातील सत्तासंघर्षाला वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्लीवरुन परतल्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांनतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. आता भाजप कामाला लागले असून, आपल्या सर्व आमदारांना मुंबई गाठण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या सर्व आमदारांचा रात्रीचा मुक्काम प्रसिडेंशियल हाॅटेलवर असणार आहे.
पक्षाकडून आमदारांना आदेश
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकरात आपल्यासोबत 51 आमदारांना घेतले. एकनाथ शिंदे आणि नाराज आमदार सध्या आसाममध्ये आहेत. हे आमदार गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. आता सत्तास्थापन करण्यासाठी भाजप तयारीला लागले आहे. राज्यातील सर्व आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत.
मविआ सरकार सर्वोच्च न्यायालयात
यादरम्यान, आता महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 16 नाराज आमदारांवर अपात्रतेची कारवाई सर्वोच्च न्यायालयात सुरु असून, ती याचिका प्रलंबित आहे. आमदार अपात्र ठरल्यास शिंदे गटाचे संख्याबळ कमी होऊ शकते. त्यामुळे जोपर्यंत या आमदारांबाबतचा निर्णय होत नाही, तोपर्यंत अधिवेशन घेता येणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community