बंडखोरांच्या केसालाही धक्का लागल्यास…; नारायण राणेंची शरद पवारांना धमकी

ट्विट करत पवारांना खडसावले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसदर्भात केलेल्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच संतापलेत. शरद पवार सर्वांना धमकी देत असून आमदारांच्या केसाला धक्का लागला तरी घर गाठणे कठीण होईल, असा इशारा राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

काय म्हणाले होते पवार?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल आणि सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईत यावेच लागेल, तसेच आमदारांना बंडोखोरीचे परिणाम भोगावे लागतील असेही शरद पवार म्हणाले.

राणेंनी दिला इशारा

या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत थेट शरद पवारांना इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना राणे म्हणाले की, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असा इशारा राणेंनी दिला आहे.

(हेही वाचा- शिवसेनेच्या धमकीला शिंदेंचे उत्तर! कुणाला घाबरवता, कायदा आम्हालाही कळतो! )

आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. तसेच त्यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला, संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा, अशी खोचक टीका राणे यांनी केली आहे. तसेच सन्माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे माझे जुने सहकारी व मित्रही आहेत व त्यांचे सहकारी सरकारमधून बाहेर पडून राज्याबाहेर आहेत. त्यांची संख्या पाहता आताच्या मुख्यमंत्र्यांनी शोभायात्रा काढली, हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here