उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यामुळे होतेय चर्चा!

90

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण आणि सत्तासंघर्ष एका वेगळ्याच वळणावर पोहोचले होते. दरम्यान गुरूवारी ३० जून रोजी राजकीय सत्ता नाट्याला पूर्णविराम मिळाला. गुरूवारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून गोपनीयतेची शपथ घेतली. महाविकास आघाडीला बाजूला सारत एकनाथ शिंदेंनी भाजपशी घरोबा केला. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री झालेले ते पहिलेच नेते ठरले आहेत. त्यामुळे याची चर्चा होत आहे.

५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री

३१ ऑक्टोबर २०१४ – १२ नोव्हेंबर २०१९ (५ वर्ष १२ दिवस)

२०१९ साली देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून नवा इतिहास घडविला होता. सलग ५ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवणारे फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरले होते. कारण १९७२च्या नंतर अशाप्रकारची कामगिरी कोणत्याच नेत्याला करता आली नव्हती, असे सांगितले जात आहे. अवघ्या ३८व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे शरद पवार यांच्यानंतरचे कमी वयात ४४व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले नेते होत. २०१४ साली फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. फडणवीस सरकार टिकणार नाही, असे अंदाज राजकीय पंडितांनी बांधले पण हे अंदाज खोटे ठरवत फडणवीसांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पक्षातील लोकांना सांभाळत, सतत टीकेचे धनुष्य बाण सोडणाऱ्या पक्षाला हाताळत फडणवीसांनी सत्तेत राहून आपला करिष्मा राज्याला दाखवला.

सगळ्यात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री

२३ नोव्हेंबर २०१९- २६ नोव्हेंबर २०१९ !

२३ नोव्हेंबर २०१९ हाच तो दिवस, स्थळ राजभवन. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. फडणवीस-पवार एकत्र येत त्यांनी पहाटेचा शपथविधी केला आणि सरकार स्थापन झालं, पण पहाटेच्या शपथविधीची ही खेळी नंतर फसली. राष्ट्रवादी-भाजप युतीचं सरकार जास्त काळ टिकू शकलं नाही तर केवळ साडे तीन दिवसांतच हे सरकार कोसळलं.

मुख्यमंत्री होऊन उपमुख्यमंत्री झालेले पहिले नेते

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पून्हा मुख्यमंत्री होतील असे जवळपास सगळ्यांनी गृहित धरलं होतं. पण अचनाक एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असे जाहीर करण्यात आले. या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा थेट मुख्यमंत्री म्हणून झाली. तर फडणवीसांनी शिवसेनेच्या एका नेत्याला मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांनी दाखवलेल्या मोठेपणाचं कौतुक होताना दिसत आहे. २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून होते. आता नव्या शिंदे सरकारमध्ये एकेकाळी मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. यामुळे मुख्यमंत्री होऊन उपमुख्यमंत्री झालेले ते पहिले नेते ठरले आहेत. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.