राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 48 तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्याने ते पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारच्या टीकेचे धनी झाले आणि पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळाला. मागच्या अडीच वर्षांत असे अनेक प्रसंग घडले. भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रयुद्धही गाजले.
( हेही वाचा: ‘ठाकरे’ सरकार पडल्यानंतर राज ठाकरेंचं पहिलं ट्विट चर्चेत! )
संघर्षाचे असे काही प्रसंग
- कुलगुरुंच्या नियुक्तीबाबत कुलपती या नात्याने राज्यपालांना असलेल्या अधिकारांचा संकोच करणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आले.
- कोरोना काळात मंदिरे पुन्हा उघडावी यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र पाठवले. त्यावरुन राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये पत्रयुद्ध झाले.
- कोरोना काळात राज्यपालांनी जिल्हाधिका-यांच्या आढावा बैठका घेतल्या. त्यावरुन शासनाची नाराजी
- मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना शासकीय विमान नाकारले. विमानातून उतरुन राज्यपाल सामान्य विमानातून देहरादूनकडे रवाना झाले.
- मे महिन्यात उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाही, असे परस्पर कळवले म्हणून राज्यपालांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.
- विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याच्या मागणीला राज्यपालांनी मान्यता दिली नाही, त्यावरुनही वाद विकोपाला गेला.
- अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या घराचे बांधकाम पाडल्याबद्दल राजभवनावर जाऊन राज्य सरकार, महापालिकेविरुद्ध तक्रार केली. राज्यपालांनी मुख्य सचिव अजोय मेहतांना राजभवनावर बोलावून नाराजी व्यक्त केली.
- राज्य सरकारच्या परवानगीशिवाय राज्यपाल नांदेड जिल्ह्यात विकासकामांच्या उद्घाटनाला जात असल्याचा मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केला होता.