महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवर अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहे. अशातच शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा एकच पक्ष आहे. शिवसेना पक्षाने किंवा उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेसह शिंदे गटाला आसाममधील गुवाहाटीला पाठवलं, शिंदेंचा बंड हा शिवसेनेच्या रणनीती भाग आहे, अशा चर्चा सुरू असताना शिंदेंनी या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे पाहायला मिळत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अशी कोणतही चर्चा माझ्या कानावर आलेली नाही. त्यामुळे मला याबद्दल कोणतीही माहिती नाही.
उद्धव ठाकरे गटाची भूमिका चुकीची
दरम्यान, १२ शिवसेना आमदारांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या कारवाईच्या भाषेवर बोलताना शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाची भूमिका चुकीची आहे. असे निलंबन करण्याचा कोणताही अधिकार नाही. आमच्याकडे संख्याबळ आहे. अर्थातच ते संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे. अशी कोणतीही कारवाई करता येत नाही. बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे आमदारांचे निलंबन केले जावे, असे देशात कोणतेही उदाहरण नाही. यासह गुवाहातील शिंदे गटाच्या बैठकीनंतर रणनीती ठरविली जाईल, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.
खरी शिवसेना कोणती?
खरी शिवसेना नेमकी कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची यावर बोलताना ते म्हणाले की, यासंदर्भात आम्ही कोणताही दावा केलेला नाही. आम्ही सर्व बाळासाहेबांचे सैनिक आहोत. आमच्याकडे संख्याबळ आहे. अर्थातच ते संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे. महाशक्तीचा जो उल्लेख केला गेला, ती महाशक्ती बाळासाहेब ठाकरे यांची शक्ती आहे. जी वेळोवेळी आम्हाला मदत करेल. आम्ही आज आणखी एक बैठक घेणार आहे. त्यानंतर आणखी काही गोष्टी पुढे स्पष्ट होतील, असेही शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community