सत्तेचा सस्पेन्स कायम, ठाकरे सरकार धोक्यात; शिंदे करणार स्वतंत्र गट स्थापन?

एकनाथ शिंदेंनी पाठिंबा देणाऱ्या आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये पोहोचल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत, आणखी 10 आमदार येणार आहेत, असा दावा केला आहे. यानंतर देखील सत्तेचा सस्पेन्स कायम असून ठाकरे सरकार धोक्यात असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशातच शिंदे यांच्यासह असलेल्या आमदारांचा फोटो देखील व्हायरल होत आहे.

…तर सरकार थेट अल्पमतात जाणार

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली आहे. अशातच शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे पत्र बुधवारी राजभवनात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकार अल्पमतात असल्याचे सांगून लवकरच विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल देण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या 37 आमदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाल्यास सरकार थेट अल्पमतात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

(हेही वाचा – राऊतांच्या ‘त्या’ आरोपाला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर)

शिंदेंनी स्पष्ट केली आपली भूमिका

एकनाथ शिंदे दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असताना आम्ही दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा कोणताही अद्याप विचार केलेला नाही. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार मला पुढे घेऊन जायचे आहे. त्यामुळे हिंदुत्वाशी कोणतीही फारकत घेणार नाही, असे मत व्यक्त करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच कोणावरही टीका करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही, असे म्हणत त्यांनी टीकाकारांना खोटक टोला लगावला आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here