प्रभाग रचनेचा निर्णय बदलताच शिवसेना ऍक्शन मोडमध्ये!

प्रातिनिधीक छायाचित्र

राज्यात सत्तांतर घडवून शिंदे गट आणि भाजपा यांनी सरकार स्थापन केले, तेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारने घेतलेलया निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत स्थगिती दिलेल्या निर्णयांपैकी मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय शिवसेनेला सर्वाधिक जिव्हारी लागला होता. मात्र या सरकारला १ महिना पूर्ण झाल्यानंतर शिंदे सरकारने बुधवार, ३ ऑगस्ट रोजी आणखी एक मोठा निर्णय बदलला, तो म्हणजे मुंबई महापालिकेतील प्रभाग वाढवण्याचा निर्णय. ठाकरे सरकारने मुंबईतील २२७ वरून २३६ प्रभाग वाढवले होते, मात्र शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द केल्यामुळे शिवसेनेला सर्वाधिक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावण्यात आली.

शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे शिवसेनेला धक्का 

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाने प्रभाग रचनेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे निश्चितच टेन्शन वाढले आहे. विशेषत: शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रभाग रचनेबाबत निर्णय घेताच शिवसेना सतर्क झाली आहे. राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये मोठमोठ्या शहरांच्या होणाऱ्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या नव्या निर्णयाचे पडसाद उमटताना दिसतील. अनेक भागांमधील राजकीय गणिते बदलतील. यामुळे शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जास्त फटका बसू शकतो. याशिवाय मुंबई महापालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. कारण शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यामुळे मुंबईतील सत्ता टिकवणे हे शिवसेनेपुढील मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळेच शिवसेना सतर्क झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित केली.

(हेही वाचा …तर २०१७च्या निवडणुकीप्रमाणे २२७ प्रभागांचे आरक्षण राहिल कायम?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here