महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारीपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अवघ्या देशाला ज्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे, त्याला अजून दोन महिने लागणार आहेत. अशा वेळी शिंदे गटाचे नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला हाणला आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर?
संजय राऊत यांनी याआधी सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार १५ फेब्रुवारी रोजी कोसळणार अशी भविष्यवाणी केली होती. आमची वेळ सुरु झाली, असेही संजय राऊत यांनी मंगळवारी, १० जानेवारी रोजी म्हटले होते. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या प्रकरणाची सुनावणी १४ फेब्रुवारीपर्यंत स्थगित केली आहे. त्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर टोला हाणला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी १४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे, त्यावर लगेच निर्णय लागणार नाही. त्यामुळे संजय राऊत यांची भविष्यवाणी खोटी ठरली आहे. आता तरी ते सुधारतील, अशी आशा आहे, असेही दीपक केसरकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community