उद्धव ठाकरे करणार का १९९७च्या सार्वत्रिक निवडणुकीची पुनर्रावृत्ती?

176

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांसह अनेक पदाधिकारी बाजूला होत शिवसेनेवरच दावा केलेला असताना मूळ शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणी करून सर्वांना पक्षात प्रवेश दिला जात असला तरी आगामी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी म्हणावी तेवढी सोपी नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी सन १९९७ची पहिली महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला न भूतो, न भविष्यती असा विजय मिळवून देत १०३ नगरसेवक निवडून आणले होते, याच  निवडणुकीतील निकालाची पुनर्रावृत्ती आता उद्धव ठाकरे करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्ष आता कठिण परिस्थितीतून जात असून, पक्ष फुटीमुळे शिवसेना पक्षाचे अस्तित्व टिकवून मूळ शिवसेना ही आपलीच आहे दाखवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आणि पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे आता मुंबईतील गल्लीबोळापासून ते राज्यातील विविध गावांपर्यंत भेटीगाठी देत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी फिरत आहेत. यासाठी विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे आता मोडेन पण वाकणार नाही असा पावित्रा घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेची  निवडणूक ही प्रतिष्ठेचीच नव्हे तर राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे.

शिवसेनाप्रमुख हयात असताना १९९७ ची महापालिका सार्वत्रिक निवडणूक ही उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेतृत्वाखाली लढवली होती. शिवसेना- भाजप युतीत लढलेल्या या निवडणुकीत शिवसेनेला १०३ जागा मिळवता आल्या होत्या, तर भाजपला त्या निवडणुकीत  २६ जागा जिंकता आल्या होत्या. परंतु त्यानंतर झालेल्या सन २००२च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पाच जागा कमी मिळाल्या, परंतु महापालिकेतील सर्वाधिक जागा अर्थात ९७ जागा शिवसेनेला जिंकून आणता आल्या होत्या.  तर त्यावेळेला भाजपच्या ९ जागांमध्ये वाढ होऊन त्यांची संख्या ३५ एवढी झाली होती. परंतु  २००७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा शिवसेनेला खाली यावे लागले आणि शिवसेनेचे ८० आणि भाजपचे २८ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर घसरलेल्या नगरसेवकांची संख्या ७५च्या खाली कधीही शिवसेनेने जाऊ दिली नाही, तर भाजपही ३५च्या पुढे जाऊ शकली नव्हती.

आजवर शिवसेना भाजप हे युतीत निवडणूक लढवत असल्याने त्यांच्यात ज्यांचे जास्त नगरसेवक त्यांच्याकडे महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद असायचे. तर भाजपला उपमहापौरपद आणि एक वैधानिक समिती असायची. कधी सुधार समिती तर कधी शिक्षण समिती. दोन्ही पक्ष युतीत लढत असल्याने त्यांच्यात जे ठरले होते, त्यानुसार या पदांचे वाटप होत होते. परंतु दोनच दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लायकी नसताना भाजपला उपमहापौर आणि समित्यांचे अध्यक्षपद दिल्याचे सांगितले.

( हेही वाचा: “…तर या घोषणाबाजीविरोधात रस्त्यावर उतरू, गरज वाटल्यास घरात घुसू”, नितेश राणे आक्रमक )

परंतु २००२च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेचे ९७ नगरसेवक होते, जर भाजपने इतरांना पाठिंबा दिला असता तर काँग्रेसचे ६१ आणि भाजपचे ३५ तसेच इतर पक्षांचे २० या संख्याबळानुसार शिवसेनेला सत्तेपासून दूर जावे लागले असते. त्यामुळे भाजपची साथ होती म्हणून शिवसेनेला सत्ता मिळवता आली, एवढेच नव्हते  सन २००७च्या सार्वत्रिक  निवडणुकीतही भाजपमुळेच शिवसेनेला सत्ता मिळाल्याची आकडेवारी सांगत आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे ८० नगरसेवक निवडून आले होते आणि काँग्रेसेचे  ७५ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे १४, समाजवादी ७ आणि मनसे ६ याची मदत घेतली असतील तर शंभरीच्या पुढे संख्या बळ जात असल्याने भाजपची शिवसेनेला असलेली मदत हीच फायदेशी ठरली.  भाजपमुळेच सन २००७ मध्ये शिवसेनेला सत्ता टिकवता आली. एवढेच नाही तर सन २०१२ मध्ये काँग्रेसला मनसेने बाहेरुन पाठिंबा दिला असता तरीही भाजपच्या पाठबळाशिवाय शिवसेनेला सत्ता राखता आली नसती. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची लायकी नसताना पदे दिल्याचे म्हटले असले तरी शिवसेनेच्या सत्ता स्थापनेत भाजप नगरसेवकांची संख्या ही निर्णायक ठरलेली असल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.