मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले असून, भाजपच्या गोटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप नेत्यांची बुधवारी रात्री बंदद्वार बैठक होऊन त्यात देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भात गुरुवारी पुन्हा फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक होणार असून त्यात नेता निव़डीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.
( हेही वाचा: नामांतराचा अधिकार राज्य सरकारला नाही, इतकी वर्ष काय केलं; राज ठाकरेंचा सवाल )
पंकजा मुंडेंकडे सदस्यत्व?
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होऊन त्यात नेता निवडीवर शिक्कामोर्तब होईल. तसेच एकनाथ शिंदे गटाशी भाजप सत्ता स्थापनेसंदर्भात वाटाघाटी करणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा करायचा की, राज्यपालांच्या आमंत्रणाची प्रतीक्षा करायची याचा निर्णयदेखील बैठकीत होणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासोबतच विधानपरिषद सदस्यत्वाचादेखील राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यांसदर्भात अद्याप निर्णय झाला नसून, त्याबाबत येत्या दोन दिवसांत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
Join Our WhatsApp Community