उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटांचा शिवसेनेवर ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या चढा-ओढीत निवडणूक आयोगाने दोन्ही गटांचे नाव व चिन्हांबाबत निर्णय दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे राहील. ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. तर शिंदे गटाला चिन्हाचे नवे तीन पर्याय मागितले आहेत. त्यानुसार शिंदे गट आज, मंगळवारी तीन नवे पर्याय देणार असून त्यापैकी एक चिन्ह त्यांना मिळणार आहे. यावर आता निवडणूक आयोग याबद्दल काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा – शिंदे गटाला पक्ष कार्यालयासाठी ‘ब्रह्मगिरी’ बंगला)
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेली मुदत संपली आहे. दोन्ही गटांनी निवडणूक चिन्ह आणि नावांवरती तीन पर्यायांचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला होता. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्रिशुळ, उगवता सूर्य, मशाल हे तीन चिन्ह पाठवण्यात आली तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे.
दरम्यान, येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हंगामी आदेश देताना निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांनी मागितलेल्या नावावर आयोगाने आदेश जारी केले आहेत. शिंदे गटाचे तिन्ही निवडणूक चिन्ह मात्र आयोगाने नाकारले असून, आज मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत तीन नव्या निवडणूक चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे करावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community