राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून बारामतीमध्ये आयोजित केलेल्या कृषी विज्ञान प्रदर्शनाला उपस्थित राहण्यास अजित पवार यांनी नकार कळवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते नाराज आहेत का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
बारामतीमध्ये आयोजित केलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी दुपारी १.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेंसह आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यक्रमाला येण्यास नकार कळवला आहे. पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे ते कृषी विज्ञान प्रदर्शनाला जाणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
( हेही वाचा: धर्मवीर की स्वराज्यरक्षक? अजित पवारांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया )
कारण काय?
शरद पवारांच्या कार्यक्रमाला अजित दादांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे शरद पवार यांनी फोन करून त्यांना झाडले होते. शिवाय, नागपुरात अधिवेशन सुरू असताना मुंबईला बोलावून घेत त्यांची कानउघाडणीही केली होती. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. बारामतीमधील कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्यामागे हे कारण तर नाही ना, अशाही चर्चा यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community