अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात सुरु असलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर रवी राणा यांनी बच्चू कडूंबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनीदेखील आक्षेपार्ह वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.
( हेही वाचा: मुंबई पालिकेतील कारभाराची ‘कॅग’ चौकशी; राज्य सरकारचे आदेश )
राणांनी भूमिका केली स्पष्ट
मागच्या काही दिवसांपासून रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु होते. राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतले असल्याचे आरोप केले होते. राणा यांच्या या वक्तव्याने दुखावलेल्या कडू यांनी निर्वाणीचा इशारा देताना राणा यांनी माफी मागावी अथवा सरकारविरोधात भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात समेटासाठी बैठक झाली. त्यानंतर सोमवारी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा यांची बैठक झाली. त्यानंतर राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Join Our WhatsApp Community