ठाण्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजपमधील अतंर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आल्याचे समजते. पोस्टर लावण्याच्या वादातून वागळे इस्टेट येथील परबवाडी भागात भाजप पदाधिका-यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. भाजपने याबाबत शिंदे गटावर आरोप केले आहेत.
भाजपाचे पदाधिकारी प्रशांत जाधव हे ठाण्यातील परबवाडी परिसरात राहतात. गुरुवारी या भागात फलक बसवण्याच्या कारणावरुन बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे प्रशांत जाधव यांच्यात वाद झाला. या प्रकारानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज दिली होती. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणाहून निघून गेले. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी अचानक 15 ते 20 जणांच्या जमावाने प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
भाजपचा शिंदे गटावर आरोप
या घटनेनंतर ठाण्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांनी केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात भाजप ठाणे या खात्यावरुन ट्वीटही करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या प्रकारानंतर ठाण्यात दोन्ही पक्षांमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असल्याची चर्चा आहे.
Join Our WhatsApp Community