जोवर शक्य आहे, तोवर धर्मयुद्ध टाळणार! पंकजा मुंडेंचा गर्भित इशारा 

मला, माझ्या बहिणीला करावे यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला राजकारणात आणले नाही. कोणतेही पद मिळवण्यासाठी मी राजकारणात आले नाही. हे आपले संस्कार नाहीत. लोकांची कामे करण्यासाठी मी राजकारणात आले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

132

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा यांच्याशी सखोल चर्चा झाली त्यांनी विश्वास दिला. केंद्रीय नेतृत्वावर आपण विश्वास ठेवूया. हे एकप्रकारे धर्मयुद्ध आहे, पण त्यात मोठे नुकसान होणार म्हणून ते टाळण्यासाठी आधी श्रीकृष्णाने प्रयत्न केले. तसे मी हे धर्मयुद्ध जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत टाळण्याचा प्रयत्न करणार, असा इशारा देत आपण हे घर कधीच तोडणार नाही, घाम गाळून हे घर उभे केले आहे, तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही, तेव्हा तूर्तास आपण याविषयावर पूर्णविराम न देता स्वल्पविराम देऊया आणि केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवूया, असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना केले.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मुंडे समर्थक नाराज झाले होते. याचा निषेध म्हणून बीड जिल्ह्यात राजीनामे सत्र सुरु झाले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी, १२ जुलै रोजी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठांची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी, १३ जुलै रोजी त्यांनी मुंबईत परतल्यावर समर्थकांशी चर्चा केली. यावेळी त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते.

मोठा नेता नेहमी त्याग करतो! 

धर्मयुद्धात जे कौरवांसोबत होते, त्यातील अनेकजण शरीराने कौरवांसोबत होते पण मनाने पांडवांसोबत होते, कर्णालाही ते बोलायचे, तसे अनेक जण मनाने आपल्या बाजूने आहेत, असे सांगत मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही, असे सांगत माझ्यावरील प्रेमापोटी राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आपण नामंजूर करत आहे, असे सांगत माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले, तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कशी जगू, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. मला दबावतंत्र करायचे नाही. मी काल दिल्लीला गेले होते. संघटनेच्या कामासाठी गेले होते. मला कुणीही झापले नाही. अत्यंत सन्मानाची वागणूक पंतप्रधान मोदी, अध्यक्ष नड्डा यांच्याकडून मिळाली. कार्यकर्त्यांनी नाराजी दूर कराल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. मी कुणालाही घाबरत नाही, निर्भिड राजकारणाचे संस्कार माझ्यावर आहेत,  मोठा नेता नेहमीच त्याग करतो, जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुध्द टाळायचा प्रयत्न करणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

(हेही वाचा : खडसेंची चौकशी करणा-या ‘त्या’ समितीचा अहवाल गहाळ)

आम्ही कोणत्याही पदासाठी राजकारणात आलो नाही!

मी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणले कारण मला वंचितांची सेवा करायला मिळायला हवी. गोपीनाथ मुंडेंनी तळागाळातील लोकांसाठी काम केले. मला राजकारणात आणताना त्यांनी मोठा विचार मनात घेऊन आणले. मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा यासाठी आम्हाला राजकारणात आणले नाही. कोणतेही पद मिळवण्यासाठी मी राजकारणात आले नाही. हे आपले संस्कार नाहीत. लोकांची कामे करण्यासाठी मी राजकारणात आले. माझा परिवार सर्व कार्यकर्त्यांचा परिवार आहे. मी कार्यकर्त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही, असेही त्या म्हणाल्या. डॉ. भागवत कराड यांचे वय 65 आहे. ते आपल्या समाजाचे आहेत. त्यांना मंत्रीपद मिळाले म्हणून मी माझ्या समाजाच्या मंत्र्यांला अपमानित का करु? लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात आहे, निवडणुकीत अनेक लोक पराभूत झाले.  मी त्यांचा अपमान करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.