शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत सरकार स्थापन करून एक महिना लोटला तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने, विरोधकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे शुक्रवारी १५ मंत्र्यांना शपथ देण्याची तयारी सुरू होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता आणि अन्य याचिकांवरील सुनावणी ८ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्याने मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी ५ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्यादृष्टीने शिवसेना आणि भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरू होत्या. राजभवनातील कर्मचारीही कामाला लागले होते. दरबार हॉलची सजावट आणि अन्य बाबींचे नियोजन सुरू होते. राज्यपाल कोश्यारी यांच्या शुक्रवारच्या वेळापत्रकात अन्य कोणत्याही कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला नव्हता.
परंतु, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सक्तीच्या विश्रांतीचा दिलेला सल्ला, या बाबी विचारात घेऊन मंत्रिमंडळ विस्तार आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात राजभवनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
( हेही वाचा: संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी )
भाजप : चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, बबनराव लोणीकर
शिंदे गट : शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत
शुक्रवारचा मुहूर्त का?
६ ऑगस्टला राज्यपालांचा नियोजित दिल्ली दौरा आहे. ७ तारखेला मुख्यमंत्री दिल्लीमध्ये निती आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या हालचाली सुरू होत्या. बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे स्पष्ट केले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मुहूर्त पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community