एकनाथ शिंदे ज्येष्ठ शिवसेना नेत्यांची भेट घेत आहेत. जे काम बाळासाहेबांच्या सुपुत्राने केलं पाहिजे, ते काम शिंदे करत आहेत. त्यांनी गजानन किर्तीकर, रामदास कदम, लीलाधर डाके आणि मनोहर जोशी अशा ज्येष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, असं शिंदेंनी म्हटलं असलं तरी त्यांचा टायमिंग पाहता ही राजकीय भेट होती यात दुमत नाही.
शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना आहे, असा संदेश यातून द्यायचा आहे. काही महिन्यांत पालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यानंतर २०२४ ला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभं राहावं लागणार आहे. त्यावेळी एकनाथ शिंदेंची खरी परीक्षा असणार आहे आणि शिंदे आता जे करत आहेत त्याचा फायदा त्या निवडणुकीत होणार आहे.
( हेही वाचा: ९५च्या युतीचे ‘ते’ स्वप्न एकनाथ शिंदे पूर्ण करणार )
ठाकरेंनी अडगळीत टाकलेल्या नेत्यांची शिंदेंनी घेतली भेट
शिंदे ज्या नेत्यांची भेट घेत आहेत, त्यांनी शिवसेना घडवली आहे आणि ठाकरेंनी या नेत्यांकडे आधीच पाठ फिरवली आहे. निवडणुकीत संजय राऊत किंवा मिलिंद नार्वेकर यांच्या नावावर १०० मते देखील मिळणार नाहीत. ते स्वतः उभे राहिले तर त्यांचे डिपॉजिट जप्त होतील. अशा लोकांना उद्धव ठाकरेंनी जवळ केलं आणि ज्यांनी शिवसेनेची पालखी स्वतःच्या खांद्यांवर उचलली त्यांना अडगळीत टाकलं. अशा दुखावलेल्या ज्येष्ठ नेत्यांची एकनाथ शिंदे भेट घेत आहेत.
ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद निवडणुकीत मतांच्या रुपात मिळणार
मनोहर जोशी शिंदेंना टाळी देतानाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो खूप बोलका आहे. या फोटोत शिंदेंचं भविष्य दडलं आहे. भविष्यात एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मोठे नेते म्हणून पुढे येणार आहेत. शिंदेंनी केलेला उठाव, यामागे मोठी योजना आहे आणि दूरदृष्टीदेखील आहे. या ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद निवडणुकीत मतांच्या रुपात नक्कीच पाहायला मिळतील.
Join Our WhatsApp Community