बेधडक वक्तव्यांमुळे सदोदीत चर्चेत राहणाऱ्या रवी राणा यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही राणा यांनी बच्चू कडू यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर फडणवीस यांनी त्यांना आपल्या सागर या निवासस्थानी बोलावून घेतले. तसेच माध्यमांसमोर बोलताना जरा जपून, अशी समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाला सोमवारी पूर्णविराम मिळाला. मात्र, कडू यांनी शक्तिप्रदर्शनाच्या सभेत राणा यांना चुचकारल्यामुळे दोहोंत पुन्हा वादाची ठिणगी पडली. बच्चू कडू यांनी अमरावतीतील सभेत बोलताना, ’पहिली वेळ असल्याने रवी राणा यांना माफ करतो’’, असे विधान केले होते. त्यावर राणा यांनी सडेतोड उत्तर दिले. “हा वाद आता मिटला आहे. पण कोणी मला दम देत असेल, तर ते योग्य नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे. बच्चू कडू जर दम देऊन बोलत असेल, तर त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया राणा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती.
मात्र, बच्चू कडू यांनी त्यावर आक्षेप घेत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांना फोन केला. त्यानंतर फडणवीस यांनी राणा यांना बोलावून घेत समज दिल्याचे कळते.
( हेही वाचा: ‘सामना’च्या पहिल्या पानावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो; जाहिरातीने चर्चांना उधाण )
राणांनी पुन्हा घेतली माघार
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर रवी राणा यांनी वक्तव्यावरून पुन्हा माघार घेतली. आमच्यातील वाद पूर्णपणे मिटला असून, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहेत. म्हणून बैठकीनंतर लगेचच मी तो वाद मिटल्याचे जाहीर केले.
- ‘घरात घुसून मारेन’ या वक्तव्यासंबंधी विचारले असता राणा म्हणाले, ते वक्तव्य कोणासाठी नव्हते. कोणी जर आम्हाला मारु, कोथळा काढू, हात छाटून टाकू, तोंड रंगवू अशाप्रकारे धमकावत असेल, त्यांच्यासाठी हे वक्तव्य होते. कोणी जर तलवारीने आमचा कोथळा काढत असेल, मारुन टाकत असेल तर जीव वाचवण्यासाठी ते करावे लागते, अशी सावध प्रतिक्रिया राणा यांनी दिली.
शिंदे-फडणवीस बोलतात तसे आम्ही करतो – नवनीत राणा
या वादाविषयी खासदार नवनीत राणा यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मला त्या विषयावर काही बोलायचे नाही. हा माझा विषय नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. ते ज्याप्रमाणे बोलतात तसे आम्ही करतो, असे सूचक विधानही त्यांनी केले.
Join Our WhatsApp Community