हनुमान चालीसाच्या आंदोलनावरुन रवी राणा आणि नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना घेरलं होतं. त्यामुळे राणा कुटुंब भाजपच्या जवळ जात असल्याचे आरोप झाले होते. खरं पाहता राणा कुटुंब शरद पवार यांच्या जवळचे आहे. परंतु देशात हिंदुत्वाची लाट आली असल्यामुळे राणांनी हनुमान चालीसाचं आंदोलन कॅश करुन घेतलं. उद्धव ठाकरे यांचा इगो दुखावला तर ते मागे पुढे न पाहता चुकीची पावले उचलतात हे सर्वांनाच कळलेलं आहे. त्याचप्रमाणे यावेळी देखील ठाकरेंनी चुकीची पावलं उचलली आणि राणांना हीरो केलं.
( हेही वाचा : मुंबई ते नागपूर फक्त ८ तासात! समृद्धी महामार्गावर प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा )
सुरुवातीला आरोप झाले की राणा भाजपच्या सांगण्यावरुन हे आंदोलन करत आहेत. परंतु रणी राणा यांचे सध्याचे वक्तव्य पाहिले की वेगळाच संशय येऊ लागतो. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद आता मिटला असला तरी रवी राणा यांनी गरज नसताना हा वाद का निर्माण केला? “बच्चू कडू गुवाहाटीला गेला आणि ५० खोके घेऊन आला.” अशा प्रकारचं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं.
यावर बच्चू कडू इतके दुखावले गेले की त्यांनी सरकारलाच अल्टिमेट दिलं. पण रवी राणा तर भाजपाच्या बाजूने होते मग भाजपा-बाळासाहेबांची शिवसेनेचं सरकार अडचणीत येईल अशाप्रकारचं विधान करण्याची रवी राणा यांना गरज काय होती? ५० खोक्यांची भाषा ठाकरे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी वापरत होती, मग हीच भाषा रवी राणांनी का वापरली. तसं पाहता रवी राणा आणि बच्चू कडू यांची जुनी दुष्मनी देखील नाही.
मग प्रश्न हाच आहे की अचानक हा मुद्दा का उपस्थित केला गेला? रवी राणा हे राष्ट्रवादीची भाषा तर बोलत नाहीत ना? जर ते शरद पवारांच्या जवळचे होते, तर ते ठाकरेंच्या विरोधात का गेले? ठाकरेंचं हिंदुत्व काढून घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट रवी राणा यांना कुणी दिलं होतं का? कारण ठाकरेंना महाविकासआघाडीचे एक महत्वाचे घटक बनवायचे असेल तर त्यांच्या जुन्या गोष्टी पुसून टाकायला हव्यात. नाही म्हटलं तरी तोंडी लावायला ठाकरे हिंदुत्व हा शब्द बळजबरीने उच्चारतात. हिंदुत्वाला दूषणे देणार्या सुषमा अंधारे देखील आता हिंदुत्ववाद शिकवू लागल्या आहेत.
म्हणूनच शंका येते की राणा कुटुंबाने ठाकरेंच्या विरोधात केलेलं आंदोलन हे भाजपाच्या सांगण्यावरुन केले होते की शरद पवारांच्या? हिंदुत्वाशी एलर्जी कोणाला आहे? कोणाला ठाकरेंना हिंदुत्वापासून तोडायचे आहे? आता बच्चू कडू यांच्यावर टिका करण्यासाठी कोणी सांगितलं असेल? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. म्हणूनच रवी राणा नेमके कोणासाठी काम करतात हा मूळ प्रश्न आहेच. याचं उत्तर बारामतीत सापडेल!
Join Our WhatsApp Community