मागील अनेक वर्षांपासून शिवाजीपार्क दादरमधील शिवसेना भवनासमोर दिवाळीत कंदिल लावण्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये चढाओढ पहायला मिळालेली आहे. परंतु यंदा शिवसेनेचे दोन गट होऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष स्थापन झाला असला तरी एरव्ही मनसेला आव्हान देणारे आमदार सदा सरवणकर हे त्या पक्षात गेल्यानंतरही त्यांना शिवसेना भवनाच्या प्रांगणात आपल्या पक्षाचा कंदिल लावता आलेला नाही. शिवसेना भवनपासून लांब अंतरावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा छोट्या आकाराचा कंदिल लावण्यात आलेला असून त्यातुलनेत शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्यावतीने शिवसेना भवनसमोर भला मोठा कंदिल लावून सरवणकरांना सदाचेच दूरवर फेकून दिल्याची चर्चा दादरमध्ये ऐकायला मिळत आहे.
दादर-शिवाजीपार्क येथील शिवसेनेचे मुख्य कार्यालय असलेल्या शिवसेना भवनाच्या परिसरात दीपावलीच्या कालावधीत लावण्यात येणा-या कंदिलावरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाले होते. मनसेला शिवसेना भवन परिसरात कंदिल लावता येवू नये म्हणून स्थानिक आमदार आणि तत्कालिन शिवसेनेचे विभागप्रमुख सदा सरवणकर आणि युवासेनेचे पदाधिकारी व नगरसेवक समाधान सरवणकर यांनी मनसेला कधी संधी मिळणार नाही याची काळजी घेत आपले कंदिल लावून जागा अडवून ठेवण्याचा प्रयत्न आजवर केला होता. परंतु आता शिवसेनेचे दोन गट झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांसह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी फुटून त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची स्थापना केली.
या बाळासाहेबांची शिवसेन पक्षात आमदार सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर गेले आहेत. परंतु शिवसेनेत असताना मनसेसमोर दादागिरी करणाऱ्या सरवणकर यांना आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेल्यानंतर शिवसेना भवनासमोरील कंदिलगिरी करता आलेली नाही. शिवसेना भवनसमोर यंदा शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रीती पाटणकर आणि प्रकाश पाटणकर यांनी भला मोठा कंदिल लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना भवनसमोरील चौकांतच हा कंदिल लावण्यात आला असून त्यांच्या डाव्या व उजव्या बाजुला म्हणजे शिवाजीपार्क दिशेला आणि एन.सी.केळकर मार्गावर दादर रेल्वे स्थानकाच्या दिशेला मनसेचेच कंदिल लावलेले पहायला मिळत आहे. शिवसेना भवनसमोर प्रभाग क्रमांक १९१चे शाखाध्यक्ष संतोष साळी आणि प्रभाग १९२चे शाखाध्यक्ष अभिषेक गुप्ता यांचे कंदिल असून काही कंदिल हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने लावण्यात आले आहे.
( हेही वाचा: Halal Product: हलाल मांस झटक्यापेक्षा वेगळे कसे? ते जाणून घ्या )
मात्र, शिवसेना भवनाच्या परिघामध्ये शिवसेनेच्या भल्या मोठ्या आकाराच्या कंदिलासोबत मनसेचे कंदिल लावलेले पहायला मिळत असले तरी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा कंदिल शिवसेना भवनापासून लांब म्हणजे लेडी जमशेटजी रोडवरील आस्वाद हॉटेलच्या पुढील बाजुस रस्त्याच्या मधोमध लावलेला दिसून येत आहे. या कंदिलवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छायाचित्रे आहे. आमदार सदा सरवणकर आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी हा एकमेव कंदिल लावलेला असून त्यांच्या आसपास भाजपचे दोन कंदिल लावण्यात आले आहे. त्यामुळे कधी काळी मनसेला लांब ठेवणाऱ्या शिवसेनेला आता एकवेळ मनसेचे कंदिल जवळपास असलेले चालतील परंतु बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कंदिलाचा प्रकाश आसपासच्या अंतरावर पडलेला त्यांना चालणार नाही, असाच इशारा आता शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाकडून दिला जात असल्याचे पहायला मिळत आहे.