शिंदे गटाचे ठरले; मुंबईतून देणार एक कॅबिनेट आणि राज्यमंत्री

168
शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबत चालल्याने आमदारांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. ही बाब लक्षात घेऊन शिंदे-फडणवीसांनी नोव्हेंबर महिन्यात विस्तार करण्याचे ठरविले असून, संभाव्य मंत्र्यांची प्रारूप यादी निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार, शिंदे गट मुंबईतून एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री देणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुंबईतील पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यात मुंबई शहरातून सदा सरवणकर आणि यामिनी जाधव, तर उपनगरातून प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर आणि दिलीप लांडे यांचा समावेश आहे. आगामी मुंबई पालिकेची निवडणूक लक्षात घेता एकनाथ शिंदे यांनी पाचपैकी दोन आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्याचे ठरवले आहे. त्यातील एकाला कॅबिनेट, तर दुसऱ्याला राज्यमंत्री पद दिले जाईल.

सदा सरवणकर यांचे मंत्रिपद निश्चित

मुंबई पालिकेतील खाचखळगे माहीत असलेल्या सदा सरवणकर यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात असून, ते कॅबिनेट मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. दादरमधील गोळीबार प्रकरणानंतर सरवणकर मागे पडल्याच्या चर्चा होत्या. परंतु, मधल्या काळात शांततेत ‘समाधान’ मानत त्यांनी आपली मंत्रीपदाची खुर्ची निश्चित केली.

( हेही वाचा: नवाब मलिक यांच्या मुलावर धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल )

मुंबई शहराला मिळणार नवा पालकमंत्री
पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना शिंदे-फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे गणित आखले आहे. सद्यस्थितीत केवळ २० जणांचे मंत्रिमंडळ असल्यामुळे काही मंत्र्यांकडे एकाहून अधिक जिल्ह्यांचे पालकत्व देण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला की त्यांच्याकडील ही अतिरिक्त जबाबदारी काढली जाईल. त्यानुसार, मुंबई शहराला नवीन पालकमंत्री मिळणार असून, दीपक केसरकर यांना या जबाबदारीतून मुक्त केले जाणार. सदा सरवणकर यांचे नाव त्यासाठी निश्चित मानले जात असून, मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगराचे पालकमंत्रीपद कायम ठेवले जाईल, असे कळते.

‘या’ आमदारांत रस्सीखेच सुरू

राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात आपली वर्णी लागावी यासाठी मुंबई उपनगरातील आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातील अनेकांना कॅबिनेट मंत्रिपदाचे वेध लागले असले, तरी त्यांची इच्छा पूर्ण करणे प्राप्त परिस्थितीत शक्य नाही. उपनगरातील शिंदे गटाच्या तीन आमदारांपैकी केवळ एकाला राज्यमंत्री पद दिले जाणार आहे. त्यामुळे सुर्वे, कुडाळकर आणि लांडे यांच्यापैकी कोण बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.