शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2004 मध्ये उद्धव ठाकरे यांनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता. एका उत्तर भारतीय बिल्डरसाठी माझा पत्ता कापला जाणार होता. परंतु बाळासाहेबांमुळे मला ते तिकीट मिळाले, असा आरोपही केला आहे.
काय म्हणाले किर्तीकर?
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर किर्तीकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी मागच्या 56 वर्षांपासून शिवसेनेत आहे. शिवसेनेतील एक ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेता म्हणून माझी ओळख आहे. तरीदेखील 2004 मध्ये उद्धव ठाकरेंनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेत असताना, तोंड दाबून मी बुक्यांचा मार खात होतो. आम्ही अपमान सहन करत होतो. पण आम्ही शिवसेना सोडून गेलो नाही. आमचा सातत्याने अपमान होत होता. 2019 ला NDI सोबत गेल्यानंतर आम्हाला मंत्रिपद मिळाले, पण तेदेखील उद्धव ठाकरेंच्या मर्जीतल्या माणसांना देण्यात आले. तेव्हा का शिवसेनेचा नेता आठवला नाही, असा सवालही किर्तीकर यांनी केला आहे.
( हेही वाचा: उद्धव ठाकरेंना धक्का; गजानन कीर्तिकर यांचा शिंदे गटात प्रवेश )
भाजपसोबतची नैसर्गिक युती कायम ठेवावी
2019 मध्ये युती होत असताना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊ नका. ते शिवसेनेसाठी घातक असेल. या आघाडीमुळे शिनसेनाच उजाडेल, असे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितले होते. आम्हाला वाटले काही बदल होईल. ते झाले नाहीत, अशी खंत किर्तीकरांनी व्यक्त केली. 40 आमदार गेले. 15 बाकी आहेत.12 खासदार गेले. मी 13 वा गेलो. पाच बाकी आहेत. समेट घडवावा. भाजपसोबतची नैसर्गिक युती कायम ठेवावी. मुख्यमंत्रीपद त्यांनी आपल्याला दिले आहे. त्याचा लाभ घेऊन संघटना बांधावी. शिवसैनिकांची कामे करावी. पण मला काही असे होताना दिसत नाही, असे ते म्हणाले.
…म्हणून शिंदे गटात केला प्रवेश
शेवटी मी ठरवले. उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात आहेत. राष्ट्रवादी किंवा काॅंग्रेस या पक्षासोबत वाटचाल होत असेल तर शिवसैनिकांना धोकादायक आहे. शिवसेनेच्या भवितव्याला धोकादायक आहे. म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्या पाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला.
Join Our WhatsApp Community