‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद करताना ठाण्यातील माॅलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मोठे विधान केले आहे. मला कोणत्याही परिस्थितीत अटक होईल, असे विधान जितेंद्र आव्हाडांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, केंद्रातील ज्येष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले की कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्यात येईल. ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत अथवा त्यानंतर काही महिने जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. पण, ही बातमी मिळते तेव्हा आश्चर्य वाटते, असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले.
( हेही वाचा: मुख्यमंत्री कार्यालयातून फोन; …अन् ‘त्या’ सहा तरुणींना मिळाले ‘सुरक्षा कवच’ )
आव्हाडांचा केंद्र सरकारला सवाल
राज्यावर सध्या 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. ते दर दिवशी वाढतच चालले आहे. अशाच पद्धतीने राज्य चालले, तर महाराष्ट्र दिवाळखोर होईल. केंद्र सरकारने मोफत धान्य आणि मोफत रेशन दिले आहे. परंतु मोफत देऊन काहीही होत नाही. तुम्ही त्या हातांना काम द्या. जे काम त्यांच्या घरात रेशन घेऊन जाऊ शकते. मोफत देता तो पैसा तुम्ही घरुन आणता का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केंद्र सरकारला विचारला आहे.