राज्याच्या राजकारणात आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावर बलात्कार पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात केदार दिघेंसोबत आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. केदार दिघे यांना उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच ठाण्याचे नवे जिल्हाप्रमुख ही मोठी जबाबदारी दिली होती. विविध मुद्द्यांवर ते एकनाथ शिंदे यांनाही घेरण्याचा प्रयत्न करत होते.
असे आहे प्रकरण
एका बलात्कार पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या विरोधात ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोअर परेलमधील एका पंचतारांकीत हाॅटेलमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित तरुणीने तक्रार करु नये म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावल्याचा आरोप केला आहे. पीडित तरणीच्या तक्रारीवरुन ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी तरुणीवर बलात्कार करणारा आणि तिला धमकावणारा अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
( हेही वाचा: शिंदे गटातील आमदारांच्या गाड्या फोडण्याचे केले होते आवाहन; थोरात यांना पुणे पोलिसांकडून अटक )
अधिक तपास सुरु
यातील मुख्य आरोपी रोहित कपूर हा केदार दिघे यांचा मित्र असून, त्याने 28 जुलैला लोअर परेल येथील पंचतारांकित हाॅटेलमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. धनादेश देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला हाॅटेलमध्ये बोलावून बलात्कार केला. त्यानंतर पैसे देऊन याबाबत कुठेही वाच्यता करु नये असे सांगितले. तरुणीने याला नकार दिल्याने, दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी भादंवि 376, 506 (2) आदी कलमांतर्गत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करुन ना.म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
Join Our WhatsApp Community