पुढच्या दोन महिन्यात राज्य सरकार कोसळेल की विरोधक कोसळतील?

99

सरकार कोसळणार अशी भविष्यवाणी अनेकांनी केली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक विधान केलं होतं. ते म्हणाले की असलं सरकार कधी जास्त काळ टिकत नाही. आपापसातील मतभेदांमुळे हे सरकार कोसळेल. आणि झालंही तसंच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ नेते यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व नाकारलं आणि पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं.

( हेही वाचा : आपण दिवस साजरे करतो, पण ते कशासाठी योजिले आहेत, याचा विचार व्हावा – महेश म्हात्रे)

आता हे सरकार काही करुन पाडायचं यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाला एक वेगळं वळण देण्यात आलं आणि या सरकारवर ताशेरे ओढण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली. आता रावसाहेब दानवे यांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दानवे म्हणाले की, “शिवसेना-भाजपची २५ वर्षांची जुनी युती तुटली. गेले अडीच वर्षे असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण तरी ते कोसळलं. त्यामुळे आता असंच राजकारण राज्यात चालत राहिलं तर आणखी दोन महिन्यांनी काय होणार?,याचा अंदाज कोणी लावू शकतं का?”

या विधानामुळे पत्रकारांनी असा अर्थ काढला की, रावसाहेब दानवे यांनी देखील सरकर कोसळेल असं सूचक विधान केलं आहे. त्यावर शिवसेना-उबाठा गटाचे प्रमुख नेते संजय राऊत म्हणाले “दोन महिन्यांनी वेगळं चित्र असेल म्हणजे मध्यावधीची घोषणा होऊ शकते किंवा सरकार कोसळू शकतं, याचे स्पष्ट संकेत रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत.” संजय राऊत हे नुकतेच तुरुंगात राहून आले आहेत. ते जरी आक्रमक दिसत असले तरी पूर्वीप्रमाणे शिवराळ भाषा आता वापरत नाहीत.

आता रावसाहेब दानवे यांच्या विधानाकडे पाहू. “एका रात्रीत अशी काय जादू झाली की महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे आता असंच राजकारण राज्यात चालत राहिलं तर आणखी दोन महिन्यांनी काय होणार?,याचा अंदाज कोणी लावू शकतं का?” असं दानवेंचं विधान आहे. दानवेंचा स्वभाव खूप मिश्किल आहे. ते शालजोडीतले मारतात. दानवेंच्या विधानामुळे संजय राऊत यांना सरकार कोसळेल असं वाटतंय. पण याचा उलटा अर्थ घेतला तर? आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी निर्माण झाली. पण भाजप पुन्हा सत्तेत आला आहे. त्यामुळे त्यांचा उद्देश सफल झाला नाही. मग आता महाविकास आघाडीची काही गरज आहे का?

आपापसातल्या कलहामुळे आघाडी सरकार कोसळले त्याचप्रमाणे आपापसातल्या कलहामुळे आघाडी कोसळू शकते. कारण हे तीनही पक्ष कोणत्याही विचारामुळे एकत्र आले नसून केवळ सत्तेची फळे चाखण्यासाठी एकत्र आले होते. आता ते फळ हातातून निसटले आहे. आता हे सरकार केव्हा पडेल याची वाट पाहणे एवढेच त्यांच्या हातात आहे आणि कोश्यारी यांच्यासारखे काही मुद्दे सापडले तर त्याविरोधात बिनकामाचे आंदोलन करणे यापलीकडे आघाडीकडे कोणतेच काम उरले नाही. म्हणून रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला पाहिजे. संजय राऊत जो अर्थ काढतात, त्यात विशेष तथ्य नाही. कारण आघाडी सरकार आणखी २५ वर्षे टिकणार असं स्वप्न त्यांना पडलं होतं. उलट अडीच वर्षात हे सरकार कोसळलं. त्यामुळे संजय राऊत यांची वक्तव्ये दाखवण्याऐवजी आपली बुद्धी (असल्यास) लावायला हरकत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.