ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओमुळे आता नवा राजकीय वादंग निर्माण झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणून शेअर केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
शनिवारी 17 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्यावतीने राज्यपाल आणि भाजप नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चाला तुरळक प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आला होता. भाजपने मोर्चाला गर्दीच झाली नसल्याचा दावा करत काही फोटो शेअर केले होते. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा संबोधत विरोधकांना टोला लगावला होता.
( हेही वाचा: हिवाळी अधिवेशनाचे कामकाज असणार ‘हायटेक’ )
मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ ट्वीट
सत्ताधा-यांकडून झालेल्या टीकेला उत्तर देताना महाविकास आघाडीने काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र, संजय राऊत यांनी ट्वीट केलेला व्हिडिओ हा मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात झाली. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राऊत यांच्याविरोधात सोमवारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होईल.
Join Our WhatsApp Community