मुंबईत भाजपचाच महापौर; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा निर्धार

107

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भ्रष्टाचारामुळे पोखरून गेली आहे. लाखो कोटी रुपये खर्च करूनही या शहराचा नियोजबद्ध विकास झालेला नाही. त्यामुळे एका घराण्याची मक्तेदारी मोडीत काढण्याची वेळ आली असून, भाजपचे नगरसेवक ते साध्य करतील. आगामी निवडणुकीत आमचे नगरसेवक प्रचंड मतांनी निवडून येतील आणि मुंबई पालिकेत भाजपचा महापौर विराजमान होईल, असा ठाम निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा : चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलारांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट)

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. यावेळी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन मी आणि आशिष शेलार नवी जबाबदारी स्वीकारणार आहोत. नव्या जोमाने संघटनशक्ती मजबूत करून तळागाळापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. राज्यभरातील ९७ हजार ३८६ बुथवर प्रत्येकी ३० युवा कार्यकर्त्यांची सेना तयार करण्याचे लक्ष्य आहे. त्यांच्या माध्यमातून भारताला सर्वश्रेष्ठ देश बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

राज्यात ४५ खासदार निवडून येतील

देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनविण्याचा आमचा मानस आहे. भ्रष्टाचारामुळे हे शहर पुढे जाऊ शकलेले नाही. जी काही विकासाची कामे झाली, ती फडणवीसांच्या काळात झाली. त्यामुळे एका घराण्याची मक्तेदारी मोडून काढत मुंबई पालिकेत भाजपचा महापौर विराजमान होईल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे २०० हून अधिक नगरसेवक निवडून येतील, पुढचा मुख्यमंत्री हा भाजप-शिवसेना युतीचा होईल, शिवाय राज्यात ४५ हून अधिक खासदार निवडून येतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

गडकरींबाबत मौन

भाजपच्या संसदीय समितीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव वगळत देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आली आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, नितीन गडकरी हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. याबाबत मला काही कल्पना नाही. जर त्यांचे यादीत नाव नसेल, तर त्यांच्यावर वेगळी काही जबाबदारी सोपवली असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.