-
सुजित महामुलकर
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका गेल्या सहा महिन्यात पार पडल्या. त्यानंतर मुंबईसह २९ महानगरपालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच लागतील, असे वाटत असताना सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा दिनांक लांबल्याने या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुका लांबणीवर पडल्याचा अंदाज येताच विरोधी पक्ष पुन्हा सुस्त झाला तर सत्ताधारी महायुतीतील भाजपा-शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा राष्ट्रवादी पक्ष मात्र निवडणुकीच्या जोरदार तयारीत व्यस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. (Maharashtra Politics)
निवडणुका लांबणीवर
विरोधी पक्षातील शिवसेना उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने डिसेंबर महिन्यात महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण आणि प्रभाग फेररचना याबाबतची सुनावणी २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पुढे ढकलली आणि राजकीय पक्षांच्या प्रयत्नावर पाणी ओतले गेले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थेट ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ पर्यंत पुढे जातील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
(हेही वाचा – Prof. Hemant Chopade यांच्या ‘शून्य, एक अनंत प्रवास’ पुस्तकास शासनाचा राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार)
विरोधकांची शस्त्रे म्यान
काँग्रेस अद्याप विधानसभेतील पराभवाच्या धक्क्यातून सावरलेला दिसत नाही. राष्ट्रवादी (शप) यांनी बैठका सुरू करत लढण्याची तयारी केली आणि निवडणूक लांब गेल्याचे दिसताच पुन्हा शस्त्रे म्यान केली. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही नुकत्याच एका समारंभात कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ‘आताच खर्च करू नका’, असा ‘मन’से सल्ला दिला. (Maharashtra Politics)
कार्यकर्त्यांचा नेत्यांना सल्ला
शिवसेना उबाठा नेत्यांना तर कार्यकर्तेच ‘मुंबईबाहेर पडून राज्यात फिरा, पक्ष बांधणी करा’ अशा विणवण्या पोटतिडकीने करू लागले आहेत. चार दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण हे खिचडी घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर जेलमधून बाहेर आले आणि थेट ‘मातोश्री’वर पोहोचले. आदित्य यांनीही त्यांची गळाभेट घेत ‘X’ या समाजमाध्यमावर नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून गद्दार, वडिलांचा फोटो चोरला, पक्ष चोरला हे पालुपद लावत चव्हाण यांना ‘प्रामाणिक माणूस’ म्हणून प्रमाणपत्र दिले. त्यावर कार्यकर्त्यांनी ‘जुने तुणतुणे बंद करा’ या धर्तीवर ज्या काही भावना व्यक्त केल्या त्यातून उबाठा नेते काही शिकू शकले नाही तर त्यांच्यासारखे ‘कमनशिबी’ तेच, अशी नोंद पुढील काही महिन्यात राज्याच्या राजकारणात होऊ शकते. भविष्यात उबाठाच्या हातून मुंबई महापालिका गेली तर या नेत्यांच्या हाताला आणि डोक्याला पुढील चार वर्षे काहीच काम उरणार नाही, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. (Maharashtra Politics)
(हेही वाचा – Delhi Election Result 2025 : इंडि आघाडीतील मित्रपक्षच ठरताहेत एकमेकांच्या पराभवाचे कारण; काँग्रेसमुळे आपचा १४ जागांवर पराभव)
भाजपाचे भरगच्च कार्यक्रम
दुसरीकडे सत्ताधारी भाजपा निवडणुका लांबणीवर गेल्याची शक्यता दिसत असली तरी पूर्ण ताकदीने कामाला लागला आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तर पक्ष कार्याला झोकून देत विविध भागांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. पक्ष बांधणी, सदस्य नोंदणी मोहीम, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, पक्ष प्रवेश असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करून वेळेचा योग्य प्रकारे सदुपयोग करण्यावर भर दिल्याचे दिसून येते. चव्हाण यांच्यासह खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हेदेखील वेळात वेळ काढून पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. (Maharashtra Politics)
आढावा, सदस्यता नोंदणी, पक्ष प्रवेश
रवींद्र चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांत अलिबाग, महाड, श्रीवर्धन, उरण, दक्षिण रायगड, छत्रपती शिवाजी नगर विधानसभा, दहिसर या विभागांतील संघटन पर्व आढावा बैठका घेत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील भाजपा सदस्यता मोहीम अधिक गतीने करण्याची गरज लक्षात घेऊन, त्यादृष्टीने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम, शहापूर आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संघटन पर्व आढावा बैठका आयोजित केल्या. “भाजपा महाराष्ट्र प्रदेश”यांच्या वतीने आपल्या सर्वांसमोर ठेवण्यात आलेले दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट सर्वांनी ताकदीने यशस्वीरित्या पूर्ण करायचे आहे. यासाठी आपल्या ठाणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी व्हावी. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात आणि हे अभियान यशस्वी करावे,” असे आवाहन चव्हाण यांनी केले. काही ठिकाणी पक्ष प्रवेशही होत आहेत, त्यांचे ‘X’ वर अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशाच प्रकारे शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवारदेखील (Ajit Pawar) कामाला लागल्याचे दिसत आहे. काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी (शप) यांच्याकडून महायुतीमध्ये येणाऱ्यांचा ओघ आता वाढताना दिसत आहे. त्यामुळे ‘विरोधी पक्ष सुस्त आणि महायुतीचा प्रवास मस्त’ असेच एकंदर राजकीय वातावरण राज्यभरात दिसत आहे. (Maharashtra Politics)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community