Maharashtra Politics : ‘मविआ’त आतापासूनच पाडापाडीचे राजकारण

उद्धव ठाकरेंच्या तर्कहीन मागणीमुळे मानापमान नाट्यास खतपाणी : दोन्ही काँग्रेस विरुद्ध शिवसेना उबाठा सामना रंगण्याची चिन्हे

127
Maharashtra Politics : 'मविआ'त आतापासूनच पाडापाडीचे राजकारण
  • सुजित महामुलकर

चार दिवसांपूर्वी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मुख्यमंत्री पदाचा चेहरा’ देण्याच्या मागणीस स्पष्ट शब्दात विरोध केला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा यांच्या महाविकास आघाडीतील पाडापाडीच्या राजकारणाची सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणीच मुळात तर्कहीन असल्याने भविष्यात दोन्ही कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना उबाठा असे मानापमान नाट्य रंगण्यास खतपाणी घालणारे आहे. (Maharashtra Politics)

खांद्यावर हात म्हणजे राजकीय भवितव्य धोक्यात

शरद पवार यांनी एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला म्हणजे त्याचे राजकीय भवितव्य धोक्यात आले किंवा शरद पवार जे बोलतात ते कधी करत नाहीत आणि जे त्यांना करायचं असतं ते कधीच बोलत नाहीत, अशी ‘आख्यायिका’ प्रसिद्ध आहे. गेल्या बुधवारी ४ सप्टेंबरला पवार यांनी ठाकरे यांचे नाव न घेता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा होण्याची त्यांची सुप्त इच्छा धुळीस मिळवली.

(हेही वाचा – वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी Pooja Khedkar ला केंद्र सरकारचा धक्का; सेवेतून बडतर्फ!)

शरद पवार-सुप्रिया विसंवाद

वरवर असे चित्र भासत असले तरी त्यामागे पवार यांची राजकीय खेळी काय असेल, यांचा अंदाज मांडणे मानवी मेंदूच्या पलीकडचे आहे, असे म्हटले जाते. पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय संख्याबळावर अवलंबून असेल, असे म्हटले. तर दुसरीकडे त्यांची कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा राष्ट्रवादी गट मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतच नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या दोन्ही विचारांमध्ये विसंवाद नाही का?

खरंच राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदात रस नाही?

खरंच राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपद घेण्यात काही रस नाही? मग त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २०२१ मध्ये ‘राजकारणात प्रत्येकालाच महत्वाकांक्षा असते, मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल,’ अशी स्पष्ट कबुलीच दिली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसला महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू झाली आहे. कारण आता राष्ट्रवादीत सुप्रिया यांना विरोध करण्यासाठी अजित पवारदेखील नाहीत आणि सुप्रिया यांच्या नावाला विरोध करणारा पक्षात कुणी नेता नाही. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – Ganesh Visarjan 2024 : श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची योग्य पद्धत)

‘स्ट्राइक रेट’चे पवारांचे गणित

२००४ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीत कॉंग्रेसने १५७ जागा लढवत ६९ जिंकल्या तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने १२४ जागी उमेदवार दिले असताना त्यातील ७१ जागा पटकावल्या. कमी जागा लढवत जास्त निवडून आणायच्या हे ‘स्ट्राइक रेट’चे गणित पवारांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही जुळवले. केवळ १० जागा लढल्या आणि आठ निवडून आल्या. २००४ ला कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा मिळूनही सहज मिळणारे मुख्यमंत्रीपद नाकारत चांगली आणि महत्त्वाची खाती घेत पवारांनी मुख्यमंत्रीपद कॉंग्रेसला दिले. तेव्हा अजित पवार किंवा राष्ट्रवादीचा एखादा नेता पक्षाचा पहिला मुख्यमंत्री होऊ शकला असता.

पवार पुन्हा मुख्यमंत्री पदावर पाणी सोडतील?

२००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. सुप्रिया सुळे यांची राजकीय कारकीर्द २००६ ला सुरू झाली. २००६ मध्ये सुळे पहिल्यांदा राज्यसभेवर गेल्या. त्यानंतर २००९, २०१४, १०१९ आणि आता २०२४ अशा सलग चार लोकसभा सुप्रिया यांनी जिंकल्या आहेत. त्यामुळे आघाडीत अधिक जागा मिळाल्या तर शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री पदावर पाणी सोडण्यास तयार होतील की राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया यांना मुख्यमंत्री पदावर बसण्याची संधी देतील?

नगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक पोस्टर झळकत होते, ज्यात कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून संबोधण्यात आले होते. गेल्या बुधवारी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल, असे जाहीर केले आणि काही वेळातच कॉंग्रेस नेते नाना पटोले यांना पुण्यातील कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावर बसण्याची इच्छा असणारे कुणीच नाही, असा समज तर शिवसेना उबाठाचा झाला नाही ना? अशी चर्चा कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसते. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – Muslim : अहिल्यानगर शहरात धर्मांध मुसलमानाकडून हिंदु महिलेला बेदम मारहाण आणि विनयभंग)

तर्कहीन मागणीमुळे नुकसान

अशा वेळी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचा आग्रह धरण्याऱ्या उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्याची चूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी करतील, यावर विद्यार्थी संघटनेतील नवखा कार्यकर्ताही विश्वास ठेवणार नाही. ठाकरे यांनी या मागणीमागचा तर्क सांगितला. ‘भाजपा-सेना युती असताना एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे राजकारण होत असे. ज्याच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री, हेच धोरण त्यावेळी होते, त्यामुळे युतीतील मित्रपक्षाचेच उमेदवार पाडायचा प्रयत्न होत असे, असा युक्तिवाद ठाकरे यांनी केला.

देशात सगळ्यात जुना राजकीय पक्ष, कॉंग्रेस आणि एक ज्येष्ठ, अनुभवी राजकारणी शरद पवार यांना हा युक्तिवाद पटेल, या भ्रमात तर शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे राहिले नाहीत ना? अशी शंका घेण्यास वाव आहे. ठाकरे यांनी तर्कहीन मागणी केल्याने उबाठाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून त्याचे रूपांतर ‘मानापमान’ नाट्यात व्हायला सुरुवात झाली आहे. परिणामी, दोन्ही कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना उबाठा असा सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Maharashtra Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.