राहुल गांधींविरोधात महाराष्ट्रात उद्रेक; ‘या’ ठिकाणी होत आहेत आंदोलने

काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात उद्रेक झाला आहे. विविध राजकीय पक्ष तसेच हिंदू संघटनांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेद्वारे प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी यांनी सातत्याने विविध ठिकाणी वीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केल्याने अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत.

( हेही वाचा: सरकार कोसळण्याच्या आदल्या दिवशी निधी मंजूर करणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदे-फडणवीसांकडून दणका! )

राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळे फासणे, जोडे मारो आंदोलन तर कुठे पुतळा जाळण्याचे प्रकार घडले आहेत. मनसेतर्फे सर्वात मोठे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे. राज्यभरातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शेगावच्या दिशेने निघाले आहेत. राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून हे आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

पुणे

राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोर भाजपचे आंदोलन झाले. हे कसले भारत जोडो हे तर वैचारिक भारत तोडो म्हणत भाजपने बॅनरबाजी केली.

मुंबईत आंदोलन

दादर फुल मार्केट भागात भाजपने आंदोलन केले. राहुल गांधींविरोधात भाजपचे युवा मोर्चाने हे आंदोलन केले. सावरकर यांच्या वक्तव्यावर माफी मागण्याची भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.

कुर्ला

वीर सावरकरांचा अवमान करणा-या राहुल गांधींचा जाहीर निषेध करण्यासाठी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील कुर्ला पूर्व स्थानकाजवळ निषेध व्यक्त करण्यात आला.

नागपूर

काॅग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने नागपुरातील गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हिंगोली

हिंगोलीत शुक्रवारी कळमनुरी शहरातील महाराणा प्रताप चौकात राहुल गांधी यांच्या प्रतिमेस काळे ऑईल लावत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी करुन वीर सावरकर यांचा जयघोष करण्यात आला. यावेळी मनसे, शिंदे गट व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here