विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणता ‘राम’?

180
विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर भाजपचे राहुल नार्वेकर विराजमान झाल्यानंतर, आता विधानपरिषदेच्या सभापती पदी कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर यासंबंधीच्या घडामोडींना वेग आला असून, भाजपकडून राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस रामराजे निंबाळकर यांना पुन्हा मैदानात उतरवणार असल्याच्या चर्चाही कानावर पडत आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत सभापती पदाच्या सिंहासनावर कोणता ‘राम’ विराजमान होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधानसभेसोबत विधानपरिषदेची सूत्रे आपल्याकडे राहावीत, यासाठी भाजप आग्रही आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सभापती पद कोणाला द्यावे, यादिशेने वरिष्ठ नेत्यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, आरक्षणाचा मुद्दा आणि जातीय समीकरणे लक्षात घेऊन राम शिंदे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून पुन्हा रामराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यास शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांसह अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. विधानपरिषदेत १० सदस्य असलेली राष्ट्रवादी सभापती पदावर दावा सांगणार असेल, तर त्यांच्या इतकेच सदस्य असलेली काँग्रेस काय भूमिका घेणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधानपरिषदेतही ‘फुटीची’ पुनरावृत्ती

विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद राष्ट्रवादी आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेतेपद शिवसेनेला मिळाले असले, तरी महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसकडे एकही संवैधानिक पद उरलेले नाही. विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर शिवसेनेसोबत काँग्रेसनेही दावा केला होता. मात्र, शिवसेनेने परस्पर अंबादास दानवे यांची निवड केली. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अधिवेशनाआधी झालेल्या विरोधकांच्या बैठकीतही त्याचे पडसात उमटले. विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी काँग्रेसचे १७ आमदार गैरहजर होते. विधानपरिषदेतही त्याची पुनरावृत्ती झाल्यास भाजपचा सभापती होण्यास अडचण नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

भाजप कोणते धक्कातंत्र वापरणार?

‘गटनेत्यांच्या बैठकीत सभापती पदाचा निर्णय घेऊ’, अशी प्रतिक्रिया अलीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर अजित पवार यांची सरकार विरोधात मवाळ झालेली भूमिका पाहता, भाजपकडून आणखी एका धक्कातंत्राचा वापर केला जाण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीशी सलोखा ठेवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होऊ शकतो, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
( हेही वाचा नवे शिवसेना भवन, मग जुन्या शिवसेना भवनाचे काय? )

कोणाकडे किती संख्याबळ?
  • भाजप – २४
  • शिवसेना – ११
  • राष्ट्रवादी – १०
  • काँग्रेस – १०
  • इतर – ७
  • रिक्त – १६

सभापतीची निवड कशी होते?

  • सभापतींचे पद रिक्त असेल अथवा रिक्त होण्याच्या बेतात असेल तेव्हा राज्यपाल सभापतींची निवडणूक घेण्याकरिता तारीख ठरवितात. त्याची सूचना सर्व सदस्यांना देण्यात येते.
  • निवडणुकीच्या तारखेच्या एक दिवस अगोदर दुपारी १२ वाजेपर्यंत प्रधान सचिवांना कोणताही सदस्य दुसऱ्या एखाद्या सदस्याचे नाव सभापती पदाकरिता प्रस्तावाच्या सूचनेद्वारे सुचवू शकतो व त्यास आणखी एका सदस्याचे अनुमोदन आवश्यक असते.
  • तसेच ज्या सदस्याचे नाव सुचविण्यात आले असेल त्यांच्याकडून तो निवडून आल्यास सभापती म्हणून काम करण्यास तयार आहे असे निवेदनदेखील प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे.
  • प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर निवडणुकीच्या दिवशी प्रस्तावांच्या क्रमांकाने कामकाज पत्रिकेवर प्रस्ताव दर्शविण्यात येतात व ते त्याच क्रमाने सभागृहात मांडण्यात येतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.