शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपापल्या दसरा मेळाव्यांची जोरदार तयारी सुरु केली असून, शिंदे यांच्या बीकेसी मैदानावरील मेळाव्याला आशीर्वाद देण्यासाठी अयोध्येतील संतमहंत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
हिंदुत्ववादी खरे कोण हे दाखवण्याची चढाओढ सुरु झाली आहे. त्यामुळे अयोध्येतील महतांचे आशीर्वाद आम्हालाच असल्याचे या निमित्ताने शिंदे गटाकडून दाखवण्याचा प्रयत्न आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानावरील ठाकरे गटाच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे पहिल्यांदाच भाषण करणार आहेत.
( हेही वाचा: काँग्रेसच्या ‘या’ पाच बड्या नेत्यांना ईडीचे समन्स )
सध्या मात्र देशाच्या विविध भागातून ठाकरे गटाचे समर्थक तसेच शिंदे गटाचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसेच, देशभरातून शिवसैनिक आणून अन्य राज्यातील पदाधिकारी व शिवसैनिक आमच्याच सोबत आहेत हे दाखवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे.
राम पंडागळे शिंदे गटात
- माजी आमदार राम पंडागळे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला.
- मूळ काॅंग्रेसजन असलेले पंडागळे यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. 2019 मध्ये ते काॅंग्रेसमध्ये परतले होते.
नार्वेकर ठाकरेंसोबतच
- उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर हे लवकरच शिंदे गटात जाणार अशा चर्चा होत्या. मात्र नार्वेकर यांनी सोमवारी एक ट्वीट करुन आपण ठाकरेंसोबतच असल्याचे सांगितले.
- ठाकरे गटाच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते शिवाजी पार्कवर गेले होते, असे सूचक ट्वीट करत आपण ठाकरेंसोबतच असल्याचे स्पष्ट केले.