अहो संजय राऊत, हिंदुत्वाशी तडजोड तर केव्हाच केलीय

173

शिवसेना-उबाठा गटाची सर्वात मोठी अडचण अशी झाली आहे की त्यांना हिंदुत्व सोडताही येत नाही आणि धरून ठेवताही येत नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका करुन ठाकरे गटाला अडचणीत टाकलं आहे. परंतु राहुल यांच्यावर टीका करण्याऐवजी ठाकरे गट भाजपलाच दोषी ठरवत आहे. कारण गांधी कुटुंबासमोर बोलण्याची अनेकांची छाती होत नाही. एनडीएच्या घटक पक्षांमध्ये गांधी कुटुंबाचा इतका दबदबा आहे की बाळासाहेबांसारख्या हिंदू वाघाच्या सुपुत्राला देखील दबून राहावे लागत आहे. यापेक्षा मोठी शोकांतिका ती कोणती!

( हेही वाचा : गोखले पुलावरील हलक्या वाहतुकीचा निर्णय पुढील दिवसांमध्ये : दोन्ही संस्थांच्या अहवालाचा सुरु आहे अभ्यास)

“सावरकरांनी अंदमान तुरुंगात १० वर्षांहून अधिक काळ घालवला. ज्यांनी तुरुंगाचा अनुभव घेतला आहे तेच ते जाणू शकतात, ते सावरकर असोत की नेहरु, नेताजी सुभाष बोस किंवा कोणीही, काळाच्या मागे जाऊन इतिहासाचे विकतीकरण बरोबर नाही” असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. पण असं बोलताना ते पुढे म्हणाले की, “आम्ही राहुल गांधींबद्दल काहीही चर्चा करणार नाही. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. पण युती तडजोडीवर चालते. युती नेहमीच तडजोडीची असते.”

या वक्तव्यावरुन संजय राऊत यांची हतबलता आणि भिती स्पष्ट दिसून येते. ते हिंदुत्वापासून केव्हाच दूर गेले आहेत. आता ते स्वयंघोषित पुरोगाम्यांच्या कंपुत शिरलेत आणि तिथे त्यांना स्थायिक व्हायचे आहे. त्यांनी आता लबाड पुरोगाम्यांशी जुळवून घेण्याची मनःस्थिती दाखवली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे तेजस्वी यादव यांना भेटले. मोदी-विरोधी व हिंदू-विरोधी म्हणजे शिवाजी महाराजांच्या विरोधकांसोबत सध्या ते वावरत आहेत. त्यांची पुरती कोंडी झाली आहे.

संजय राऊत म्हणतात की युती तडजोडीवर चालते परंतु राहुल गांधी यांनी अशी कोणती तडजोड केली आहे? सगळी तडजोड ठाकरे गटाला करावी लागत आहे. बाळासाहेबांना हिंदुह्रदयसम्राट म्हणणे सोडून देणे ही केवढी तरी मोठी तडजोड होती. हा हिंदुह्रदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान होता. राहुल गांधींना खुश करण्यासाठी आपल्या दैवताचा अपमान करण्यात मागे-पुढे पाहिले नाही. याला हिंदुत्वाशी तडजोड नाही का म्हणता येणार?

सावरकर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तडजोड करता येणार नाही हे वाक्य करुण स्वरात बोलताना भाजपाशी युती असताना सकाळ-संध्याकाळ ज्या भाषेत ते भाजपावर टीका करत होते ते विसरले का? युतीत असताना भाजपावर आवाज चढवता येत होता, परंतु आघाडीत असताना गांधी कुटुंबावर आवाज चढवता येत नाही. कारण गांधी कुटुंबाची घटक पक्षांमध्ये दहशत आहे आणि त्यांच्यासमोर बोलण्याची कुणाचीही हिंमत होत नाही. आता त्यात ठाकरे गटाचा समावेश झाला आहे. दुःखाची बाब अशी की ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणवतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.