शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्राॅपर्टी नाही. ते प्रत्येक शिवसैनिकांचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांनंतर बाळासाहेब ठाकरेंचे नाव सभेत घेतले जाते. त्यांची उंची एवढी खुजी करु नका, असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना इशारा दिला आहे. तसेच, माझ्या वडिलांच्या नावाचा वापर करु नका, तुमच्या आई- बाबांच्या नावाचा वापर करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यालाच प्रतिउत्तर म्हणून शिरसाट यांनी हे वक्तव्य केले आहे.
( हेही वाचा: मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना, सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला; ठाकरेंचा शिंदे गटावर गंभीर आरोप )
पालापाचोळा कोणाला म्हणताय?
शिवसेनेतून बाहेर गेलेल्यांना पाने गळाली, पालापाचोळा असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी मुलाखतीतून केला आहे. यावर बोलताना, संजय शिरसाट म्हणाले, पाने गळाली त्यांचा अपमान करु नका. आज आम्हीही पाहत आहोत. मनोहर जोशी, लीलाधर ढाके तुमच्याबरोबर बसलेले दिसत नाहीत. हे काळाबरोबर बदलत जात. नव्याचे स्वागत करा, पण आपल्या घरातल्यांना विसरु नका. तुम्ही शिवसैनिकांना पाला पाचोळा म्हणू नका. सरपोतदार, लीलाधर ढाके हे काय पाचोळा होते, मनोहर जोशी आजही आहेत. या मोठ्यांच्या सावलीत तर आम्ही वाढलो. या नेत्यांनी एकेका गावात- खेड्यात जाऊन शिवसेना रुजवायचे काम केले. त्याला पाला पाचोळा म्हणता येणार नाही. माझ्यासारख्याने 38 वर्षे शिवसेनेत घालवली. उद्या तुम्हाला कोणी पालापाचोळा म्हटले तर काय होईल? असा सवालही शिरसाट यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community