महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता गुरूवारच्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सिब्बल यांच्या युक्तिवाद संपला असून आता ठाकरे गटाच्या बाजूने अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडत आहेत.
( हेही वाचा : अरुणाचल प्रदेशात लष्कराचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर कोसळले! वैमानिकांचा शोध सुरू)
सरन्यायाधीशांचा ठाकरे गटाला सवाल
- अपात्रतेच्या भितीमुळे आमदार निवडणूक आयोगाकडे न जाता गुवाहाटीला गेले, दहाव्या परिशिष्टाला बाजूला सारण्यासाठी हे सगळं केलं गेलं असा युक्तिवाद न्यायालयामध्ये अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
- यावर जर शिंदेंसोबत असलेले आमदार भाजपमध्ये विलीन झाले असते तर त्यांची शिवसेना म्हणून त्यांना ओळख मिळाली नसती. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्याय नव्हता. आमदारांचे म्हणणे होते की, आमचा पक्षाध्यक्षांवर विश्वास राहिलेला नाही अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली.
- प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी पुरेशी प्रणाली उपलब्ध आहे. जर तोडगा निघाला नाही तर तुम्ही राजीनामा द्या पण फक्त मतभेदामुळे तुम्ही सरकार पाडाल का असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.
- यावर सरन्यायाधीश म्हणाले, “राज्यपालांकडे कोणतेही पुरावे नसल्यामुळे त्यांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले. तुम्ही न्यायालयाला सांगत आहात की आम्ही असं सरकार पुन्हा सत्तेत आणावं ज्यांनी राजीनामा दिला.” पुढे सरन्यायाधीश म्हणाले, “न्यायालय अशा सरकारला पुन्हा सत्तेत कसं आणू शकतं ज्यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. ज्या सरकारने बहुमत चाचणीचा सामनाच केला नाही. आमची समस्या आहे की तुम्हाला सत्तेतून बाहेर काढलेलं नाही. तुम्ही स्वत: पायउतार झालेला आहात.”