शरद पवारांना लोकशाही हवेय की घराणेशाही?

129

अंधेरी पोटनिवडणुकीवरून सध्या राजकारण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे निवडणूक लढवत आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ही पोटनिवडणुक बहुचर्चित ठरली आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले आहे. एकीकडे लोकशाहीच्या नावाने गळे काढायचे आणि दुसरीकडे लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारी ही निवडणूक होऊच नये, अशी भूमिका शरद पवार यांच्यासारख्या राजकारण्याने घेणे हे खरोखरच दुर्देवी आहे.

नेमका कोणता संदेश द्यायचा आहे?

रमेश लटके यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त करणे हे बरोबरच आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर त्या जागेवर त्यांच्या घरातील व्यक्तीच यायला हवी हा आग्रह धरणे आणि इतरांना तसे आवाहन करणे कितपत योग्य आहे, तेही शरद पवार यांच्यासारख्या राजकीय नेत्याने. पवारांना लोकशाही हवी आहे की घराणेशाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. व्यक्तिपूजा ही लोकशाही विरोधी असते, हे पवारांना कोणी सांगण्याची गरज नाही. मग तरीही जाहिरपणे ते अशी भूमिका का बरे घेत असतील? नेमका कोणता संदेश त्यांना यातून द्यायचा असेल? मुरजी पटेल यांच्या विजयाची खात्री तर पवारांना वाटत नसावी ना, म्हणूनच तर ते असा भावनिक मुद्दा पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अंधेरीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे म्हणत असताना, शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावेळची आठवण सांगितली आहे. म्हणे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ‘जर मुंडे कुटुंबातील कोणी निवडणुकीला उभे राहणार असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नाही’ अशी भूमिका आम्ही घेतली होती. पवार यांच्यासारख्या व्यक्तिने असे उदाहरण देताना त्याची तुलना तरी आताच्या घटनेशी होऊ शकते का याचा विचार करायला हवा होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षातील इतरांना उमेदवारी जाऊ द्या, स्वत: पवार जरी उभे राहिले असते तरी ते निवडून आले असते का? त्यामुळे अशी विधाने करून केवळ जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न पवार करत आहेत.

( हेही वाचा: राज ठाकरेंनी अंधेरी निवडणूक लढू नका सांगितल्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… )

मृताच्या टाळूवरेच लोणी खाणाऱ्यांकडून आदर्शवादाच्या गप्पा!

शरद पवार हे अंतकरणपूर्वक आणि अगदी निर्मळ हेतूने ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे म्हणत आहेत असे आपण एकवेळ मानू. पण मग ते पुण्यातील खडकवासला मतदारसंघातली निवडणुक विसरले का? त्यांचा हा आदर्शवाद तेव्हा कुठे गेला होता? रमेश वांजळे हे मनसेकडून २००९च्या निवडणुकीत जिंकले होते. जून २०११ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणूकीत त्यांची पत्नी हर्षदा वांजळे या मनसेकडून निवडणूक लढवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तेव्हा कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या हर्षदा वांजळे यांना राष्ट्रवादीने स्वत:च्या पक्षाकडून उमेदवारी देऊन त्या परिस्थितीचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. हर्षदा वांजळे यांनी मनसेची उमेवारी घेऊ नये हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच डाव होता. रमेश वांजळे यांच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांच्या पत्नीचा विजय स्वत:च्या पक्षाच्या नावावर करण्याची धडपड तेव्हा राष्ट्रवादीने केली. या वृत्तीला खरेतर मृताच्या टाळूवरेच लोणी खाणे म्हणतात. अर्थात जनतेने तेव्हा लोकशाहीची ताकद दाखवून दिली आणि या निवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर विजयी झाले.

अर्थात शरद पवारांना खडकवासला येथील तेव्हाच्या पोटनिवडणुकीची आठवण करून देण्याची गरज नाही. सोयीनुसार भूमिका घेणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. मात्र राजकीय स्वार्थासाठी अशी विधाने करताना त्याला आदर्शवादाचा मुलामा लावण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये एवढीच अपेक्षा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.