खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यावरून वाद सुरू असताना आता ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते ठाण्यात आमने-सामने आल्याचे दिसून आले. ठाण्यातील कोपरीमधील शिवसेना शाखेसाठी ठाकरे-शिंदे भिडले. कुंभारवाडा शाखा ताब्यात घेण्यावरून हे दोन्ही गट समोरा-समोर आले. मनोरमानगरमध्ये असलेल्या या शाखेबाहेर दोन्ही गटात राडा झाला त्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
(हेही वाचा – अरबी समुद्रातील शिवस्मारकाची एकही वीट न रचता २५ कोटींचा खर्च)
ठाण्यातील मनोरमानगर भागात वाचनालय ताब्यात घेण्यावरून काही दिवसांपूर्वी शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाले असतानाच, शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील कोपरीतील कुंभारवाडा भागातील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा आमने सामने समोर आले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करत दोन्ही गटांना शाखेची चावी देऊन वाद मिटविला.
कोपरी परिसरातील कुंभारवाडा भागात शिवसेना शाखा असून हा परिसर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात येतो. या शिवसेना शाखेचे शिंदे गटाकडून नुतनीकरण करण्यात येणार आहे. परंतु ही शाखा तोडणार आहेत, अशी अफवा पसरली आणि त्यानंतर शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपनेत्या अनिता बिर्जे, कृष्णकुमार कोळी हे समर्थकांसह शाखेत दाखल झाले. त्यावेळेस शाखेत शिंदे गटाचे प्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड, माजी नगरसेवक मालती पाटील आणि शर्मिला पिंपोळकर या उपस्थित होत्या. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते परिसरात जमू लागले आणि शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट आमने सामने आले.
शाखा शिवसेनेचीच आहे…
या वादाबाबत माहिती मिळताच शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, राम रेपाळे यांच्यासह कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर शाखेत जाऊन बसले. काही जण प्रसिद्धीसाठी असा प्रकार करीत असून या शाखेचे आम्ही नूतनीकरण करीत आहोत. कॉग्रेस तसेच राष्ट्रवादी सोबत मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी नव्हे तर भगव्याशी एकनिष्ठ असणाऱ्यांनी शाखेत बसावे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी दिली. तर शाखेवर कोणीही हक्क सांगू नये, त्यांना काम करायचे असेल तर त्यांनी बसावे काम करावं शाखा शिवसेनेचीच आहे, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community