राजकीय पदार्पणापूर्वीच शिवसेनेवर चढले ‘तेजस’ तेज

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस हेही आता राजकारणात प्रवेश करणार असून, भविष्यात शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे हे युवा सेना अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनतील, तर युवा सेना अध्यक्षपदाची जबाबदारी  तेजसवर सोपवत त्यांना राजकीय पदार्पण करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे तेजस ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणाची चर्चा असतानाच, रविवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर जाहीरपणे शुभेच्छा दिल्या. आजवर तेजस ठाकरे यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या नव्हत्या. परंतु पक्ष आता अडचणीत असून तेजसच्या राजकीय पदार्पणाची पक्षातील सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे भविष्य आता तेजसच्या हाती येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये या वाढदिवसांच्या निमित्ताने का होईन एकप्रकारे तेज चढलेले पहायला मिळत आहे.

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेवर ठाकरे घराणे लादले जाणार नाही, तुम्ही त्याचा स्वीकार केला तरच…(ते राजकारणात येतील),असे बाळासाहेबांनी २०१०मध्ये जाहीर सभेमध्ये स्पष्ट केले होते. निमित्त होते तत्कालिन शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणाचे. बाळासाहेबांच्या हस्ते आदित्य ठाकरे यांना तलवार भेट देत त्यांचे राजकीय पदार्पण पार पडले आणि पुढे युवा सेनेचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले होते. त्यामुळे आदित्य यांच्यानंतर आता तेजसला राजकारणात आणले जाणार असून या माध्यमातून शिवसेनेवर ठाकरे घराणे लादले जात आहे. बाळासाहेबांनी आजवर सोनिया गांधी, ओमर अब्दुल्ला यांच्यावर घराणेशाहीवरून आरोप केले होते. यावर बाळासाहेबांनी  तुम्ही कोणाचे नेतृत्व स्वीकारता. राहुल हा नेतृत्वाच्या लायकीचा आहे, असा सवाल केला होता. त्यामुळे घराणे शाहीवर आरोप करणाऱ्या बाळासाहेबांचे दुसरे नातूही राजकारणात येत असल्याने घराणेशाहीचा शिक्का पुन्हा एकदा शिवसेनेवर लागला आहे.

आम्ही शिवसेनेवर ठाकरे कुटुंब लादणार नाही, तुम्ही स्वीकारले तर असे बाळासाहेबांनी स्वत: सांगून ठेवल्याने तेजस ठाकरे यांच्यासाठी पक्षात अनुकूल वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे रविवारी त्यांच्या जन्मदिनी त्यांना शुभेच्छा देणारे शुभ संदेश सोशल माध्यमातून करण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ स्तरावर प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार यावर्षी तेजस ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती, तसेच सोशल माध्यमातूनही शुभेच्छा देत तेजसची ओळख पदार्पणापूर्वीच मुंबईसह राज्याला घडवून देण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून झाला आहे.

( हेही वाचा: पुरावे सादर करायला वेळ द्या; ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे विनंती )

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १० ऑक्टोबर २०१० च्या जाहीर सभेत या आदित्याला आपण स्वीकारले असले तरी उध्दवचा धाकटा पोरगा हा माझ्यासारखा आहे. तेजस हा कडक डोक्याचा अर्थात आक्रमक आहे. मला जी आवड आहे, ती त्यालाही आहे. मला बागकाम आवडतं आणि त्यालाही. मला मत्सालय आवडतं. मी कुत्री पाळलीत, ती आवडही त्याला आहे. तेजस हा प्राण्यांमध्ये आणि पर्यावरणामध्ये रमणारा आहे,असे वर्णन बाळासाहेबांनी केले होते. तर शिवसेना विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मागील वर्षी त्यांच्या वाढदिवशी एक घाव, दोन तुकडे अशाप्रकारचे ट्विट करत तेजसच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून दिली होती. मागील ऑक्टोबर २०१९मध्ये वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरताना तेजसने तिथे हजेरी लावली होती, तर मागील शिवसेनेच्या शिवतिर्थावरील सभेत तेजस आपल्या आई रश्मी ठाकरे यांच्यासमवेत आल्याचे पहायला मिळाले होते.

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार आणि १४ खासदार फुटून गेल्यानंतर पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करण्यासाठी आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत आहे. मात्र, पक्षाची बांधणी करताना युवा सेनेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून याची जबाबदारी युवा सेनेचे अध्यक्षपद देण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे शिवसैनिकांना आता तेजसच्या राजकीय पदार्पणाचीच प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here